Sonakshi Sinha : पैसे घेऊन एका कार्यक्रसाठी हजर न राहिल्याबद्दल अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाविरुद्ध न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. उत्तर प्रदेश येथील मुरादाबादच्या एसीजेएम-4 न्यायालयातून हे वॉरंट जारी करण्यात आले आहे. न्यायालयात हजर न राहिल्याने सोनाक्षी सिन्हाविरोधात हे वॉरंट बजावण्यात आलं आहे.


मुरादाबाद येथील प्रमोद शर्मा यांनी 2018 मध्ये कटघर पोलीस ठाण्यात सोनाक्षी सिन्हासह पाच जणांविरुद्ध 36 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. या खटल्याच्या सुनावणीसाठी सोनाक्षी न्यायालयात हजर राहत नसल्याने तिच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केलं आहे. सोनाक्षी सिन्हाला अटक करून 24 एप्रिल रोजी कोर्टात हजर करण्याचे आदेश कोर्टाने पोलिसांना दिले आहेत. याप्रकरणी पुढील सुनावणी 24 एप्रिल रोजी होणार आहे.


विमानाच्या तिकिटाचे पैसे देऊनही सोनाक्षी सिन्हा दिल्लीत होणाऱ्या कार्यक्रमाला हजर राहिली नाही, असा आरोप प्रमोद शर्मा यांनी केला आहे. शर्मा यांनी सोनाक्षीला टॅलेंट फुलऑन आणि एक्साइड एंटरटेनमेंट कंपनीच्या माध्यमातून इंडिया फॅशन अँड ब्युटी अवॉर्डसाठी आमंत्रित केले होते. हा कार्यक्रम 30 सप्टेंबर 2018 रोजी दिल्लीतील श्री फोर्ड ऑडिटोरियममध्ये होणार होता. परंतु, सोनाक्षी या कार्यक्रमाला हजर राहिली नव्हती. 


सोनाक्षी सिन्हाने या कार्यक्रमचा प्रमोशन व्हिडीओ शेअर केला होता. परंतु, ती कार्यक्रमासाठी हजर राहिली नाही. या कार्यक्रमाला येण्यासाठी 29 लाख 92 हजार रुपये मोजण्यात आले होते. याबाबत प्रमोद शर्मा यांनी 2019 मध्ये काटघर पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. परंतु, पोलिसांनी तक्रार नोंदवून न घेतल्याने शर्मा यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला.


सोनाक्षी सिन्हा या प्रकरणासंदर्भात आपला जबाब नोंदवण्यासाठी 14 ऑगस्ट रोजी मुरादाबादला गेली होती. शर्मा यांनी या संपूर्ण प्रकरणाची दोन वेळा मुख्यमंत्री पोर्टलवर तक्रारही केली होती. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत सोनाक्षी सिन्हावर कलम 420 आणि 406 अंतर्गत आरोपपत्र दाखल केले.


महत्वाच्या बातम्या