Usha Uthup Husband Jani Chacko Uthup Death : भारतीय पॉप आयकॉन उषा उथुप (Usha Uthup) यांचे पती जानी चाको उथुप यांचे सोमवारी कोलकाता येथे निधन झाले. ते 78 वर्षांचे होते. कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, जानी यांनी त्यांच्या राहत्या घरी टीव्ही पाहताना अस्वस्थत वाटत असल्याची तक्रार केली होती, त्यानंतर त्यांना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
कुटुंबीयांने दिलेल्या माहितीनुसार, उषाचे पती जानी यांच्या मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका आहे. उषाचे पती जानी हे चहाच्या मळ्याशी संबंधित होते. 70 च्या दशकाच्या सुरुवातीला हे दोघे पहिल्यांदा भेटले होते, त्यांच्या पश्चात एक मुलगा आणि एक मुलगी आहे.
उषा उथुपचे पहिले लग्न दिवंगत रामू यांच्यासोबत झाले होते. यानंतर त्याने जानी चाको उथुपसोबत दुसरे लग्न केले. उषा उथुप यांनी अनेक भाषांमध्ये गाणी गायली आहेत. या मध्ये काही प्रसिद्ध बॉलिवूड गीतांचाही समावेश आहे.
1969 मध्ये चेन्नईतील एका छोट्या नाईट क्लबमध्ये परफॉर्म करून त्यांनी आपल्या संगीत कारकिर्दीला सुरुवात केली होती. उषा उथुप या इतक्या प्रसिद्ध झाल्या की, त्यांनी कोलकाता येथील ट्रिनकास सारख्या नाईट क्लबमध्ये परफॉर्म करण्यास सुरुवात केली. याचदरम्यान त्यांची जानी यांच्याशी भेट झाली. शान से, वन टू चा चा, हरी ओम हरी, फ्रेंड्स से प्यार किया, रंबा, कोई यहाँ आहा नाचे नाचे, नाका बंदी यासारखी लोकप्रिय गाणी त्यांनी गायली.
मुलीने केली पोस्ट...
उषा उथुप यांचे पती जानी चाको यांच्या निधनावर त्यांची मुलगी अंजली उथुपने पोस्ट करत शोक व्यक्त केला आहे. अंजलीने म्हटले की, अप्पा...आपण फार लवकर निघून गेलात...तुम्ही किती स्टायलिशपणे वास्तव्य करत होते...जगातील सर्वात सुंदर व्यक्ती...आम्ही तुमच्यावर प्रेम करतो...
उषा उथुप यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मान
या वर्षाच्या सुरुवातीला उषा उथुप यांना संगीत क्षेत्रातील योगदानासाठी तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मभूषण देऊन सन्मानित करण्यात आले होते. पॉप आयकॉन क्वीन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या गायिकेने न्यूज 18 ला दिलेल्या मुलाखतीत याबद्दल सांगितले होते, “हा एक अविश्वसनीय क्षण होता. ही भावना अजून संपलेली नाही. माझ्या प्रतिभेला मान्यता दिल्याबद्दल मी भारत सरकारचा आभारी असल्याचे त्यांनी म्हटले होते.