मुंबई : 'उरी - दी सर्जिकल स्ट्राईक' चित्रपटाने कमाईच्या बाबतीत नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. 'उरी'ने कमाईमध्ये सुपरहिट 'बाहुबली-2' सिनेमालाही मागे  टाकलं आहे. 23 आणि 24 व्या दिवशी उरी सिनेमाने बाहुबली-2 सिनेमापेक्षा जास्त कमाई केली आहे. उरी सिनेमाचं हे मोठं यश मानलं जात आहे.


सिनेसमीक्षक तरण आदर्श यांनी ट्वीट करुन ही माहिती दिली. 'उरी - दी सर्जिकल स्ट्राईक'ने 23 व्या दिवशी 6.53 कोटींची कमाई केली. तर बाहुलबली-2 ने 23 व्या दिवशी 6.35 कोटींचा बिझनेस केला होता. याशिवाय 'उरी - दी सर्जिकल स्ट्राईक'ने 24 व्या दिवशी 8.71 कोटींची कमाई केली होती. तर बाहुबली-2 ने 24 व्या दिवशी 7.80 कोटींची कमाई केली होती.





'उरी'ने 24 दिवसात 189.76 कोटी रुपये कमावले आहेत. सिनेमाची लोकप्रियता पाहता याच आठवड्यात सिनेमा 200 कोटींचा टप्पा पार करेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. ‘उरी : द सर्जिकल स्ट्राइक’ या चित्रपटातून भारतीय जवानांनी पाकिस्तानवर केलेल्या सर्जिकल स्ट्राईकची शौर्यगाथा सांगण्यात आली आहे. चित्रपटाचे प्रेक्षकांसह समीक्षकांकडून कौतुक होत आहे.





जम्मू- काश्मीरमधील 'उरी' येथे भारतीय लष्कराच्या कॅम्पवर दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला. त्यानंतर भारतीय सैन्याने पाकव्याप्त काश्मीरमध्ये शिरून सर्जिकल स्ट्राईक केला होता. उरी हा चित्रपट याच सत्य घटनेवर आधारित आहे.


आदित्य धरने सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. तर विकी कौशल, यामी गौतम, मोहीत रैना, किर्ती कुल्हाडी, परेश रावल, मानसी पारेख या कलाकारांनी सिनेमात अभिनय केला आहे.