मुंबई : देशातल्या दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या सर्वात मोठ्या लढाईचा निकाल लागत आहेत. देशभरातल्या 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर होत आहे. भाजपने उत्तर प्रदेशमध्ये जोरदार मुसंडी मारली आहे. या विजयावर गानकोकिळा लता मंगेशकर आणि दिग्गज गायिका आशा भोसले या भगिनींनी ट्विटरवरुन भाजपला शुभेच्छा दिल्या आहेत.


'नमस्कार. आदरणीय नरेंद्र मोदीजी, अमित शाहजी आणि भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांना शानदार विजयाबद्दल खूप खूप शुभेच्छा.' असं ट्वीट लता मंगेशकर यांनी केलं आहे. यापूर्वीही लता मंगेशकरांनी पंतप्रधान मोदींना अनेकवेळा पाठिंबा दर्शवला होता.



दिग्गज गायिका आशा भोसले यांनीही भाजपला अप्रत्यक्ष पाठिंबा दर्शवला आहे. 'भारतीय लोकशाहीचा भाग असल्याचा मला अभिमान आहे. पुढील लोकसभा निवडणुकीत कोणाची सत्ता येणार, हे ओळखणं फारसं कठीण नाही' असं ट्वीट आशा भोसले यांनी केलं आहे.



उत्तर प्रदेशात भाजपच्या पारड्यात तीनशेच्या जवळपास जागा मिळाल्या आहेत. तर काँग्रेस-सपाचा मेरु सत्तरच्या आसपास रोखण्यात भाजपला यश आलं आहे. मायावतींना पुरता धक्का बसला असून बसपला 20 पेक्षा कमी जागा मिळाल्या आहेत.

उत्तराखंडमध्येही भाजपने घवघवीत यश मिळवलं आहे. मणिपूर-गोव्यात काँग्रेस-भाजपमध्ये काँटे की टक्कर पहायला मिळाली. पंजाबमध्ये मात्र काँग्रेसला एकहाती यश मिळालं आहे.