Sai Pallavi : दक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी (Sai Pallavi) सध्या तिच्या आगामी चित्रपट 'विराट पर्वम'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. नुकतेच या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान अभिनेत्रीने काश्मिरी पंडितांबद्दल असे काही वक्तव्य केले की, त्यावरून वाद सुरू झाला आहे. साई पल्लवीने दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्या 'द काश्मीर फाइल्स' या चित्रपटातील काश्मिरी पंडितांवरील अत्याचार आणि हत्येच्या प्रसंगांची तुलना मॉब लिंचिंगशी केली आहे. यानंतर आता तिच्या वक्तव्यावरून सोशल मीडियावर देखील वादविवाद सुरु झाला आहे. अनेक लोक तिच्या वक्तव्याला पाठिंबा देत आहेत. तर, काही तिच्यावर टीका करत आहेत.
अभिनेत्री साई पल्लवी तिच्या बेधडक वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हिंसा आणि धर्माच्या मुद्द्यावर बॉलिवूडचा प्रसिद्ध चित्रपट ‘कश्मीर फाइल्स’चा संदर्भ देताना अभिनेत्री म्हणाली की, ‘या चित्रपटात काश्मिरी पंडितांची त्यावेळी हत्या कशी झाली, हे दाखवण्यात आले आहे. पण, त्यापलीकडे जाऊन हिंसेला धर्माशी जोडले, तर काही दिवसांपूर्वी गायींनी भरलेला ट्रक घेऊन जाणाऱ्या एका मुस्लिम व्यक्तीलाही बेदम मारहाण करून जय श्री रामचा नारा देण्यास सांगितले. या दोन घटनांमध्ये काय फरक आहे?’ यावर आता नेटकरी देखील आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.
पाहा काय म्हणतायत नेटकरी..
सई पल्लवीच्या या वादग्रस्त वक्तव्यानंतर तिला सोशल मीडियावर टीकेला सामोरे जावे लागत आहे. यादरम्यान काही ट्विटर युजर्सनी ट्विट करून लिहिले की, 'तुम्ही जे काही बोललात ते खूप चुकीचे आहे'. तर, काही युजर्स म्हणत आहेत की, 'आम्हाला साई पल्लवीची बेधडक स्टाईल आवडली. दाक्षिणात्य कलाकार कधीही सत्य बोलण्यास मागेपुढे पाहत नाहीत'. अर्थात साई पल्लवीच्या वक्तव्यावर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत.
साई पल्लवीच्या ‘विराट पर्वम’ची चर्चा
'विराट पर्वम' या चित्रपटात साई पल्लवीने एका नक्षलवाद्याच्या प्रेमात पडलेल्या मुलीची भूमिका साकारली आहे. तिचा हा चित्रपट 17 जून रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. याच्या प्रमोशनदरम्यान मीडियाच्या प्रश्नांना उत्तर देताना साईने हे वादग्रस्त विधान केले आहे. ‘विराट पर्वम’मध्ये सईसोबत राणा दग्गुबती, प्रियामणी आणि नंदिता दास देखील दिसणार आहेत. ही प्रेम आणि राजकारणाची संमिश्र कथा आहे. राणा दग्गुबती या चित्रपटाचा निर्माताही आहे.
हेही वाचा :
In Pics: मेकअप न करताही साई पल्लवीचं सौंदर्य पाहून तुम्हीही व्हाल थक्क!
PHOTO: बनवा साउथ क्वीन साई पल्लवीला तुमची इन्स्पीरेशन; घ्या टिप्स!