TOP 10 Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या -


ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर


बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आशा पारेख यांना यंदाच्या दादासाहेब फाळके पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे. याबाबत केंद्रीय अनुराग ठाकूर यांनी माहिती दिली आहे. 30 सप्टेंबरला आशा पारेख यांना दादासाहेब फाळके पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे. आशा पारेख यांनी अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्यांच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. 


बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणची प्रकृती खालावली


बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण सध्या चर्चेत आहे. दीपिका पदुकोणला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रकृती खालावल्याने तिला मुंबईतील ब्रीच कॅंडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सध्या दीपिकाची प्रकृती सुधारली असून तिला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे.


आदिपुरुषचा टीझर आयोध्येत होणार लाँच


दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता प्रभासचा 'आदिपुरुष' हा चित्रपट सध्या चर्चेत आहे.  या आगामी चित्रपटाचा टीझर आणि पोस्टर हे 2 ऑक्टोबर रोजी उत्तर प्रदेशातील अयोध्या येथे रिलीज करण्यात येणार आहे. शरयू नदीच्या काठावर एक भव्य समारंभाचे आयोजन करण्यात आलं आहे. या समारंभात आदिपुरुष या चित्रपटाचे टीझर प्रदर्शित करण्यात येणार आहे. आदिपुरुष चित्रपटाचं दिग्दर्शन ओम राऊतनं केलं आहे. ओम राऊतनं ट्विटरवर ट्वीट शेअर करुन आदिपुरुषच्या टीझर लाँचच्या कार्यक्रमाची माहिती दिली आहे. 


करीनाने पाहिला सैफचा चित्रपट ‘विक्रम वेधा’


बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर-खाननेही पती सैफ अली खानच्या चित्रपटाचा रिव्ह्यू दिला आहे. करीनाने 'विक्रम वेधा'वर कौतुकाचा वर्षाव केला आहे. चित्रपट पाहिल्यानंतर करीना कपूरने एक इन्स्टा स्टोरी शेअर केली. ही स्टोरी शेअर करताना करीना कपूर खानने ‘विक्रम वेधा’चे पोस्टर पोस्ट केले आणि कॅप्शनमध्ये लिहिले, 'सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट कथा, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, काय चित्रपट आहे, एकदम 'ब्लॉकबस्टर'.


युट्यूबर अब्दु राजिक होणार भाईजानच्या बिग बॉसमध्ये सहभागी


'बिग बॉस' हा छोट्या पडद्यावरचा वादग्रस्त पण तितकाच लोकप्रिय कार्यक्रम आहे. येत्या 1 ऑक्टोबरला भाईजानचा 'बिग बॉस' सुरू होणार आहे. 'बिग बॉस' हा कार्यक्रम अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने या पर्वात कोणते स्पर्धक सहभागी होणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे. अशातच या पर्वातील पहिल्या स्पर्धकाचं नाव समोर आलं आहे. युट्यूबर अब्दु राजिक या पर्वात सहभागी होणार आहे. 


चित्रपट झाले आता नेटकरी करतायत 'बॉयकॉट' इंडियन आयडॉलची मागणी! 


सध्या टीव्ही विश्वात रिअ‍ॅलिटी शोंचा सुळसुळाट झाला आहे. यातच नेहमीच चर्चेत असणारा रिअ‍ॅलिटी शो म्हणजे इंडियन आयडॉल. इंडियन आयडॉल आणि वाद हे आता एक समीकरण बनलं आहे. नुकतीच या शोवर बंदी घालण्याची मागणी सुरु झाली आहे. ‘बिग बॉस’, ‘खतरों के खिलाडी’ आणि आता ‘इंडियन आयडॉल’बाबत वाद सुरू झाला आहे. इंडियन आयडॉलबद्दल पूर्वीही म्हटले जायचे की, हा शो आधीच स्क्रिप्टेड आहे. पण, आता चाहते या शोवर थेट बंदी घालण्याचीच मागणी करत आहेत.


'चाळीमध्येच राहत होते, लालबाग-काळाचौकी माझं माहेर' :  नम्रता संभेराव


नम्रतानं तिच्या बालपणीचे काही किस्से एका लाईव्हमध्ये सांगितले. ती म्हणाली,'मला लहानपणी गरबा आणि दांडिया खेळायला आवडायचं. नवरात्रीला दररोज मी दांडिया खेळायला जायचं. दसऱ्याला बक्षीस समारंभ असायचा. या समारंभात मला बक्षीस म्हणून मला खड्याळ मिळायचं.' एवढे कॅरेक्टर्स कसे करु शकते? असा प्रश्न नम्रताच्या एका चाहत्यानं लाईव्हमध्ये विचारला. या प्रश्नाला उत्तर देत नम्रता म्हणाली, “माझी निरीक्षण चांगली आहे. मी आधी चाळीमध्येच राहत होते. लालबाग-काळाचौकी येथे माझं माहेर. त्यामुळे तिथे आजूबाजूच्या लोकांचे मी निरीक्षण करत होते. ”


दाक्षिणात्य अभिनेता ‘बेभान’मध्ये मृण्मयीसोबत झळकणार


मराठी सिनेसृष्टीत अनेक नवनवीन विषय हाताळले जात असून, हिंदी सिनेसृष्टीत आपले नशीब आजमावणारे कलाकारही आता मराठी सिनेसृष्टीकडे वळत असल्याचे आपण पाहिले आहे. आता यामध्ये आणखीन एका नावाची भर पडली आहे आणि ते नाव आहे अनुपसिंह ठाकूर. ‘बेभान’ या सिनेमात अनुपसिंह मृण्मयी देशपांडेसोबत झळकणार आहे. 


कनिका माननं खतरों के खिलाडी 12 च्या निर्मात्यांवर केले गंभीर आरोप


कलर्स वाहिनी आणि खतरों के खिलाडी 12 च्या निर्मात्यांशी कनिका मानचा वाद झाला आहे. तिनं निर्माते आणि कलर्स चॅनलवर आरोप केला आहे की, टीव्हीवर तिची नकारात्मक प्रतिमा दाखवली जात आहे. 


'त्याला' बिग बॉसच्या घरात बंद केलं पाहिजे; महेश मांजरेकर


'बिग बॉस मराठी'च्या घरात महेश मांजरेकरांना सिद्धार्थ जाधव, गौरव मोरे, शिवाली परब, नम्रता संभेराव, प्रवीण तरडेंना बघायला आवडेल. हे स्पर्धक बिग बॉस मराठीच्या घरात चांगलाच कल्ला करतील आणि हा कार्यक्रम एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवतील, असं महेश मांजरेकर म्हणाले.