TOP 10 Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या -
'पोन्नियिन सेल्वन' चित्रपटाचा भव्य ट्रेलर रिलीज
मणिरत्नम यांचा पोन्नयिन सेल्वन-1 हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. हा ट्रेलर तामिळ, तेलगू, मल्याळम, हिंदी आणि कन्नड अशा पाच भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात 10 व्या शतकाचा इतिहास दाखवण्यात आला आहे. ऐश्वर्या राय बच्चन पोन्नियिन सेल्वनमध्ये राणी नंदिनीची भूमिका साकारत आहे. तर ट्रेलरमधील ऐश्वर्याच्या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. 30 सप्टेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
जस्टिन बीबरने वर्ल्ड टूर केली रद्द
हॉलिवूडचा लोकप्रिय गायक जस्टिन बीरचे चाहते जगभर आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी जस्टिन बीबर आजाराशी झुंज देत असल्याने चर्चेत आला होता. पण आता जस्टिन बीबर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. जस्टिन बीबरने वर्ल्ड टूर रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
'माझी तुझी रेशीमगाठ' मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप
छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध मालिका 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेला प्रेक्षकांची पसंती मिळाली. या मालिकेच्या कथानकानं आणि मालिकेमधील कलाकारांच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकली. या मालिकेत प्रसिद्ध अभिनेता श्रेयस तळपदे आणि अभिनेत्री प्रार्थना बेहरे यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. या मालिकेमध्ये परीची भूमिका मायरा वायकुळने साकारली आहे. या सर्व कलाकारांनी मालिकेतील अभिनयानं प्रेक्षकांच्या मनावर आधिराज्य गाजवलं. पण आता ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. त्यामुळे मालिकेचे चाहते नाराज झाले आहेत.
'पल्याड' चित्रपटाचं मोशन पोस्टर प्रदर्शित
मागील बऱ्याच दिवसांपासून अनेक चित्रपट महोत्सवात पुरस्कार पटकावल्याने चर्चेत आलेला 'पल्याड' हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. अंतर्मुख होऊन विचार करायला लावणारं कथानक, समाजाचं वास्तव दाखवणारा ज्वलंत आशय, कसलेल्या कलाकारांचा लक्षवेधी अभिनय आणि विषयाचं गांभीर्य मनावर ठसवणारं कल्पक दिग्दर्शन या आणि अशा बऱ्याच कारणांमुळे 'पल्याड'बाबत उत्सुकता वाढली आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या मोशन पोस्टरने 'पल्याड' बाबतची उत्सुकता आणखी वाढवण्याचं काम केलं आहे. प्रदर्शित झाल्यापासून वाऱ्याच्या वेगानं मोशन पोस्टर जनमानसापर्यंत पोहोचत आहे.
कोळी समाजाच्या भावना दुखावण्याचा माझा कोणताही हेतू नाही : वर्षा उसगांवकर
वर्षा उसगांवकर या मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांनी कोळी समाजाबद्दल एक वादग्रस्त विधान केलं होतं. त्यामुळे त्या चर्चेत आल्या होत्या. आता या प्रकरणी त्यांनी हात जोडून कोळी समाजाची माफी मागितली आहे. माफी मागतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेत परीसमोर आलं अविनाशचं सत्य
'माझी तुझी रेशीमगाठ' ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. मालिकेत नव-नवीन ट्वीस्ट येत असल्याने ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. आता या मालिकेत परीसमोर अविनाशचं सत्य आलं आहे.
‘ब्रह्मास्त्र’ आणि ‘विक्रम वेधा’ बॉलिवूडला तारणार?
'ब्रह्मास्त्र' आणि 'विक्रम वेधा' बॉलिवूडला तारणार? सध्या हाच प्रश्न बॉलिवूडमध्ये विचारला जाऊ लागला आहे. आणि याचं कारण आहे गेल्या काही महिन्यांपासून बॉक्स ऑफिसवर सुपरफ्लॉप होणारे बिग बजेट हिंदी सिनेमे. तर दुसरीकडे दक्षिणात्य सिनेमे बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींच्या उड्या मारू लागलेत. हिंदी चित्रपटसृष्टीवर दक्षिणेतील सिनेमांचं आक्रमण होत असताना मोठं वादळ घोंघावत असताना 'ब्रह्मास्त्र' आणि 'विक्रम वेधा' काहीशी आशा घेऊन समोर येत आहेत. चांगला कंटेंट असेल तर प्रेक्षक त्याला डोक्यावर घेतातच. 'ब्रह्मास्त्र' आणि 'विक्रम वेधा'चा कंटेंट चांगला दिसत आहे. त्यामुळेच हे दोन्ही सिनेमे बॉलिवूडला तारणार का? असा प्रश्न सध्या पडत आहे.
वादग्रस्त ट्वीटमुळे अटकेत असलेल्या कमाल आर खानला जामीन
वादग्रस्त वक्तव्य आणि ट्विट्समुळे असणाऱ्या कमाल आर खानला आता जामीन मिळाला आहे. चित्रपटात काम देतो असं सांगून महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं होतं. हे प्रकरण तीन वर्षापूर्वीचं आहे. आता जामिन मिळाला असला तरी तरी केआरकेला तुरुंगाची हवा खावी लागणार आहे.
महाकालच्या दर्शनाला आडकाठी, आलिया-रणबीरविरोधात हिंदुत्ववादी संघटनेची निदर्शनं
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट यांचा ब्रह्मास्त्र हा चित्रपट 9 सप्टेंबर रोजी रिलीज होणार आहे. सध्या या रणबीर आणि आलिया या चित्रपटाचं प्रमोशन करत आहेत. आलिया, रणबीर आणि दिग्दर्शक अयान मुखर्जी हे मंगळवारी (6 सप्टेंबर) उज्जैनमध्ये महाकालचं दर्शन घेण्यासाठी गेले होते. यावेळी हिंदू संघटनांच्या विरोधामुळे महाकालचं दर्शन न घेताच ब्रह्मास्त्रच्या टीमला माघारी परतावं लागलं. ब्रह्मास्त्र सिनेमातील काही दृश्यांवर हिंदुत्ववादी संघटनांचा आक्षेप आहे. त्यामुळे त्यांनी ब्रह्मास्त्र चित्रपटाच्या टीमचा विरोध केला.
‘समकालीन रंगभूमी असो किंवा अभिजात, महाराष्ट्राने कायमच वैविध्य दिले आहे’: सविता प्रभुणे
अशोक समेळ यांचे नाटक ‘कुसुम मनोहर लेले’ हे मराठी रंगभूमीवरील अढळस्थान प्राप्त झालेले नाटक असून त्याच्या हिंदी आवृत्तीमध्ये महत्त्वाची भूमिका करत असलेल्या अभिनेत्री सविता प्रभुणे यांनी रंगभूमीबाबत सांगितलं. त्या म्हणाल्या, 'समकालीन रंगभूमी असो किंवा अभिजात, महाराष्ट्राने कायमच वैविध्यपूर्ण आशय दिला आहे. आजही या नाटकाचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. या नाटकाचा भाग होणं, ही कलाकार म्हणून माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. रंगभूमीसाठी सविता ताईंच्या मनात कायमच खास जिव्हाळा राहिला आहे. त्या म्हणाल्या, ‘झी थिएटर त्यांच्या महामंच महोत्सवात मराठी नाटकांना प्रामुख्याने आपल्यासमोर आणत आहेत ही कौतुकाची गोष्ट आहे.’