TOP 10 Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या -


अभिनेते मोहनलाल यांच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी; निर्माते अँटोनी पेरुम्बावूर यांच्याकडून 'दृश्यम 3' ची घोषणा


अभिनेते मोहनलाल यांच्या  दृश्यम या चित्रपटानं प्रेक्षकांची मनं जिंकली. या चित्रपटाचे आतापर्यंत दोन भाग रिलीज झाले आहेत. या दोन्ही भागांना प्रेक्षकांची पसंती मिळाली.  दृश्यम-3 रिलीज होणार की नाही? असा प्रश्न मोहनलाल यांच्या चाहत्यांना पडला होता. आता क्राईम थ्रिलर असणाऱ्या दृश्यम या चित्रपटाचा तिसऱ्या भागाची निर्माते अँटोनी पेरुम्बावूर यांनी अधिकृतपणे घोषणा केली आहे. माझविल एंटरटेनमेंट अवॉर्ड्स या कार्यक्रमामध्ये अँटोनी पेरुम्बावूर यांनी 'दृश्यम-3' बाबत माहिती दिली आहे. 


बिग बॉस मराठीचा चौथा सीझन 'या' दिवशी पासून होणार सुरू


बिग बॉस मराठी हा छोट्या पडद्यावरील वादग्रस्त कार्यक्रमाची प्रेक्षकांमध्ये चांगलीच क्रेझ आहे. चौथ्या सीझनचे दोन प्रोमो आतापर्यंत प्रदर्शित झाले आहेत. त्यामुळे हा सीझन कधी सुरू होणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे. अशातच बिग बॉसच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. 25 सप्टेंबरपासून हा कार्यक्रम सुरू होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. 


'महाराष्ट्र शाहीर' सिनेमाची रिलीज डेट जाहीर


केदार शिंदेंच्या 'महाराष्ट्र शाहीर' (या सिनेमाची घोषणा झाल्यापासून हा सिनेमा चर्चेत आहे. हा सिनेमा शाहीर साबळे यांच्या जीवनावर आधारित आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन शाहीर साबळे यांचा नातू आणि लोकप्रिय दिग्दर्शक केदार शिंदे यांनी केलं आहे. आता या सिनेमाची रिलीज डेटदेखील जाहीर झाली आहे. 


अभिनेत्री शिवानी सुर्वेचा 'आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे' मधील डॅशिंग लूक


'आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे' या सिनेमातील अभिनेत्री शिवानी सुर्वेचा डॅशिंग लूक आज शिवानीच्या वाढदिवसानिमित्त रिलीज करण्यात आला आहे. 'आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे' या सिनेमाचं शूटिंग मराठी आणि कन्नड भाषेत झालं असून हा सिनेमा हिंदी, तेलुगु, मल्याळम, तमिळ भाषेत प्रदर्शित होणार आहे. पुढील वर्षात हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 


कोरोनाची लागण झाल्यानंतर अमिताभ बच्चन यांची बदलली लाईफस्टाईल


बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. सध्या ते घरीच कोरोनावर उपचार घेत आहेत. कोरोनाची लागण झाली असली तरी ते सोशल मीडियावर चांगलेच अॅक्टिव्ह आहेत. प्रकृतीसंदर्भात माहिती देणारा एक ब्लॉग त्यांनी लिहिला आहे. आपली सर्व कामं आपण स्वत: करतोय असं ते ब्लॉगच्या माध्यमातून म्हणाले आहेत. 


बिग बॉस सीझन-4 चा प्रोमो चर्चेत


छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध शो बिग बॉस मराठी या कार्यक्रमाच्या तीन सीझन्सला प्रेक्षकांची पसंती मिळाली. गेल्या सीझनचा विशाल निकम हा विजेता ठरला होता. आता लवकरच या कार्यक्रमाचा चौथा सीझन प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या सीझनचे सूत्रसंचालन महेश मांजरेकर हेच करणार आहे. महेश यांनी बिग बॉस मराठीच्या तीन सीझन्सचे सूत्रसंचालन केले होते. नुकताच या सीझनचा एक नवा प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. हा प्रोमो कलर्स मराठीच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे.


"मला गोमांस खायला आवडतं"; 'बॉयकॉट ब्रम्हास्त्र' दरम्यान रणबीरचा व्हिडीओ चर्चेत


सध्या बॉलिवूडचे अनेक बिग बजेट सिनेमे नेटकरी बॉयकॉट करत आहेत. यात अक्षय कुमार, आमिर खान, शाहरुख खान अशा सुपरस्टार्सच्या सिनेमांचा समावेश आहे. अशातच आता बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूच्या ('ब्रम्हास्त्र' सिनेमालादेखील नेटकऱ्यांनी बॉयकॉट करायला सुरुवात केली आहे. "मला गोमांस खायला आवडतं", असं रणबीर म्हणाल्याने 'ब्रम्हास्त्र' सिनेमावर बहिष्कार घालण्याची मागणी नेटकरी करत आहेत. 


'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेत नवा ट्विस्ट; अविनाशचं सत्य आलं यशसमोर


'माझी तुझी रेशीमगाठ' ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. सध्या ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. अशातच मालिकेत आता नवा ट्विस्ट आला आहे. अविनाश नेहाचा पहिला नवरा असल्याचं सत्य यशसमोर आलं आहे. 


आदर्श शिंदेच्या आवाजातील गाणं येणार प्रेक्षकांच्या भेटीस


ओ शेठ आणि लय गुणाची हाय या गाण्यांच्या सुपरहिट यशानंतर संध्या प्रनिकेत ही आगळी वेगळी जोडी घेऊन आली आहे बाप्पाचं एक गोड गाणं ज्या गाण्यात सोज्वळता आणि प्रत्येकाला थिरकायला लावणारी ऊर्जा असं सगळं आहे. तसेच गाण्याचे शब्द संध्या प्रणिकेतचे असून या गाण्याला संगीतबद्ध सुद्धा संध्या प्रनिकेत ने स्वतःच केलं आहे. आपल्याला त्यांच्या कम्पोजिशन बद्दल तर माहितीच आहे. 


सोनाली फोगाट मृत्यूप्रकरण: तीन आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी; गोवा पोलिसांकडून छापेमारी सुरू


भाजप नेत्या आणि सोशल मीडिया स्टार सोनाली फोगट हत्याप्रकरणात कर्लिज हॉटेलचा मलिक एडविन न्यून्स आणि ड्रग्ज विक्रेता दत्ताप्रसाद गावकर यांना अंजुना पोलिसांनी अटक करून दंडाधिकारी न्यायालयात हजर केले. या दोघांशिवाय रामा मांद्रेकर नावाच्या ड्रग्स पेडलरला देखील अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. तिन्ही आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.  रामा मांद्रेकर हा दत्ताप्रसाद गावकरला ड्रग्ज पुरवायचा. दत्ताप्रसाद गावकर हा द ग्रँड लिओनीमध्ये वेटरचं काम करायचा. तो येथील लोकांना ड्रग्स देऊन कर्लिज नाईट क्लबमध्ये पाठवायचं काम करत होता. कर्लिज क्लबचा मालक एडविन आणि ड्रग पॅडलर दत्ताप्रसाद यांचे संबंध व्यावहारिक होते म्हणजेच दोन्ही आरोपी व्यावसायिक व्यवहारासाठी एकमेकांशी संपर्क साधत होते, असे तपास केल्यानंतर गोवा पोलिसांना समजले.