TOP 10 Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या -
Daagdi Chawl 2 : ‘रिअल डॅडीं’च्या हस्ते दगडी चाळीत झाला ट्रेलर आऊट
मुंबईतील गॅंगवॉरमधील सर्वात मोठे नाव म्हणजे 'अरुण गुलाब गवळी' उर्फ 'डॅडी'. त्यांच्या 'दगडी चाळी'वर आधारित 'दगडी चाळ' हा सिनेमा काही वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता. ज्याप्रमाणे डॅडींनी अवघ्या मुंबईवर राज्य केले तसेच या चित्रपटानेही अवघ्या महाराष्ट्रावर राज्य केले. आता पुन्हा एकदा अवघ्या महाराष्ट्रावर राज्य करायला 'दगडी चाळ 2' सज्ज झाला असून नुकताच या सिनेमाचा ट्रेलर आणि पोस्टरचे अनावरण ‘रिअल डॅडीं’च्या हस्ते दगडी चाळीत झाले असून ट्रेलर पाहून चित्रपट पाहाण्यासाठी प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
"मी एफआयआरला घाबरत नाही", अडचणीत वाढ झाल्यानंतर मुकेश खन्नाचं वक्तव्य
छोट्या पडद्यावरील 90 च्या दशकातील प्रसिद्ध मालिका 'शक्तिमान' प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली असून या मालिकेमुळे मुकेश खन्ना घराघरांत पोहोचला. पण महिलांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने आता मुकेश खन्ना चर्चेत आला आहे. दिल्ली महिला आयोगाने दिल्ली पोलिसांकडे मुकेश खन्ना विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. पण "मी एफआयआरला घाबरत नाही", असे वक्तव्य मुकेश खन्नाने केलं आहे.
कॉमेडियन राजू श्रीवास्तव रुग्णालयात दाखल
प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांना दिल्लीमधील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. रिपोर्टनुसार, त्यांना हृदयविकाराचा झटका आला आहे.
सुबोध भावेच्या हस्ते 'टकाटक 2'चा उत्कंठावर्धक ट्रेलर लाँच
सुबोध भावेच्या हस्ते नुकताच 'टकाटक 2'चा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. यावेळी सुबोध भावेने 'टकाटक'च्या आठवणींना उजाळा देत संपूर्ण टीमचं कौतुक केलं. 'टकाटक 2'ला बॅाक्स ऑफिसवर भरघोस यश मिळावं यासाठी सुबोध भावे यांनी शुभेच्छाही दिल्या. 18 ऑगस्ट रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणारा 'टकाटक 2' हा चित्रपट प्रेक्षकांचं टकाटक मनोरंजन करणार आहे.
आमिर खान अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात नतमस्तक
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता आमिर खान हा सध्या त्याच्या लाल सिंह चड्ढा या चित्रपटामुळे चर्चेत आहे. आमिरचा हा चित्रपट 11 ऑगस्ट रोजी रिलीज होणार आहे. या चित्रपटामध्ये आमिरसोबतच अभिनेत्री करीना कपूर आणि मोना सिंह हे कलाकार देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत. नुकतीच आमिरनं अमृतसरमधील सुवर्ण मंदिराला भेट दिली आहे. यावेळी आमिरसोबत मोना सिंह देखील होती.
'क्रिमिनल जस्टिस'च्या नव्या सीझनचा ट्रेलर रिलीज
ओटीटी विश्वात पंकज त्रिपाठीचे नाव आदराने घेतले जाते. अनेक लोकप्रिय वेबसीरिजमध्ये पंकजने काम केलं आहे. पंकजची 'क्रिमिनल जस्टिस' ही वेबसीरिज प्रचंड गाजली होती. आता या वेबसीरिजचा तिसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या सीरिजचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
संजय खापरे म्हणतायेत ‘डोन्ट वरी हो जायेगा’
मराठी चित्रपट आणि नाटक क्षेत्रात लीलया वावरत आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या अभिनेता संजय खापरे यांचा स्वत:चा असा अंदाज आहे. त्यांच्या शब्दकोशात ‘नाही’ हा शब्दच नाही. ‘डोन्ट वरी हो जायेगा’ हा त्यांच्या कानमंत्र आहे. हाच कानमंत्र घेऊन रंगभूमीवर एक नाटक घेऊन ते सज्ज झाले आहेत.
उर्फी जावेदला रुग्णालयातून डिस्चार्ज
अभिनेत्री उर्फी जावेदला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. प्रकृती खालावल्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उर्फीने रुग्णालयातील फोटो शेअर करत चाहत्यांना यासंदर्भात माहिती दिली होती. दोन दिवसांनंतर उर्फीला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
'मन उडू उडू झालं' मालिका अंतिम टप्प्यात; इंद्राने मानले प्रेक्षकांचे आभार
'मन उडू उडू झालं' ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. सध्या मालिकेत आनंदी-आनंद पाहायला मिळत आहे. इंद्रा-दीपू नुकतेच लग्नबंधनात अडकले आहेत. कार्तिक आणि सानिका सुधारण्याचा प्रयत्न करत आहेत. मालिका आता अंतिम टप्प्यात आलेली आहे. त्यामुळे मालिकेतील इंद्राने म्हणजेच अजिंक्यने सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेक्षकांचे आभार मानले आहेत.
रणवीरच्या अडचणीत वाढ; न्यूड फोटोशूट विरोधात कोलकाता हायकोर्टात जनहित याचिका दाखल
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता रणवीर सिंह त्याच्या न्यूड फोटोशूटमुळे सध्या चर्चेत आहे. रणवीरनेच्या मॅगझीनच्या कव्हरसाठी न्यूड फोटोशूट केलेय. या रणवीरच्या न्यूड फोटोला कमेंट करुन अनेकांनी रणवीरला ट्रोल केलं आहे. काही नेटकऱ्यांनी तर रणवीरच्या या न्यूड फोटोवर भन्नाट मीम्स तयार केले. रणवीरच्या या फोटोशूटच्या विरोधात पुण्यात तसेच चेंबूर येथे गुन्हा दाखल झाला होता. आता कोलकाता येथील उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.