TOP 10 Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या -
'दे धक्का 2' आणि 'एकदा काय झालं' बॉक्स ऑफिस आमने-सामने
कोरोनानंतर अनेक बिग बजेट सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. अनेक सिनेमागृहांबाहेर हाऊसफुल्लचे बोर्ड झळकत आहेत. अशातच दोन बिग बजेट सिनेमांची बॉक्स ऑफिसवर टक्कर होणार आहे. 'दे धक्का 2' आणि 'एकदा काय झालं' हे दोन सिनेमे बॉक्स ऑफिसवर आमने-सामने येणार आहेत.
सैराटमधील सल्याला पुण्यात रिक्षावाल्याकडून मनस्ताप
सैराटमधील सल्याला म्हणजेच अरबाज शेखला पुण्यातील रिक्षाचालकाने त्रास दिला आहे. फेसबुक पोस्ट करत त्याने यासंदर्भात माहिती दिली आहे. रिक्षाचालक मीटरप्रमाणे येण्यास नकार देत मनमानी भाडे आकारत आहेत. रिक्षाचालकांकडून प्रवाशांची लूट केली जात आहे. हे सर्व प्रकार थांबावेत यासाठी अरबाजने फेसबुक पोस्ट केली आहे.
तापसीच्या 'शाबास मिथू'मध्ये झळकणार मराठमोळी अभिनेत्री तितिक्षा तावडे
बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नूचा 'शाबास मिथू' 'शाबास मिथू' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात तापसी भारतीय क्रिकेटर मिताली राजच्या भूमिकेत दिसणार आहे. तर या सिनेमात मराठमोळी अभिनेत्री तितिक्षा तावडेदेखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.
आर्यन खानला मुंबई सत्र न्यायालयाचा मोठा दिलासा
क्रूझ ड्रग्स प्रकरणी क्लीन चिट मिळालेला बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन याने 30 जून रोजी विशेष एनडीपीएस कोर्टात आपला पासपोर्ट परत मिळावा यासाठी याचिका दाखल केली. याप्रकरणी न्यायालयाने एनसीबीला उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले. या प्रकरणाच्या सुनावणीसाठी 13 जुलैची तारीख निश्चित करण्यात आली होती. त्यानुसार आता आर्यन खानला मुंबई सत्र न्यायालयाचा दिलासा मिळाला आहे. एनसीबीनं जप्त केलेला पासपोर्ट आर्यन खानला परत देण्याचे निर्देश मुंबई सत्र न्यायालयाने दिले आहेत.
'मन उडू उडू झालं' मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप
'मन उडू उडू झालं' या मालिकेत सध्या नव-नवीन ट्विस्ट येत असून सध्या ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. सध्या या मालिकेतून काही पात्रांची एक्झिट झाली असून लवकरच ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. त्यामुळे इंद्रा-दीपूचे चाहते नाराज झाले आहेत.
'द ग्रे मॅन' नेटफ्लिक्सवर होणार रिलीज
अभिनेता धनुषनं दाक्षिणात्य चित्रपसृष्टीबरोबरच बॉलिवूडमध्ये देखील विशेष ओळख निर्माण केली आहे. धनुष त्याच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतो. आता धनुष हा लवकरच हॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. धनुष हा द ग्रे मॅन या रुसो ब्रदर्सच्या चित्रपटातून हॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार आहे. द ग्रे मॅन हा चित्रपट नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे.
74 व्या एमी पुरस्काराचे नामांकन जाहीर
74 व्या एमी पुरस्कार सोहळ्याचे नामांकन आज (मंगळवारी) जाहीर झाले आहेत. यात 'सक्सेशन' या वेबसीरिजला 25 नामांकन मिळाले आहेत. तर स्क्विड गेम: द चॅलेंज' या वेबसीरिजच्या चाहत्यांसाठीदेखील एक आनंदाची बातमी आहे. या वेबसीरिजला सर्वोत्कृष्ट नाट्य या विभागासह आणखी 13 नामांकन जाहीर झाले आहेत.
के. एल. राहुलसोबत लग्नाच्या चर्चेवर अथियानं सोडलं मौन
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सुनील शेट्टीची मुलगी अथिया शेट्टी ही क्रिकेटपटू केएल राहुलसोबत लवकरच लग्नगाठ बांधणार आहे, अशी चर्चा सध्या सुरु आहे. अथिया आणि के. एल राहुल हे सध्या त्यांच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आहेत. अथिया आणि के. एल राहुल हे तीन महिन्यानंतर लग्नगाठ बांधणार आहेत, असंही म्हटलं जात आहे. या सर्व चर्चेवर आता अथियानं रिअॅक्शन दिली आहे. अथियाच्या रिअॅक्शननं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
पुण्यातील मेट्रो स्थानकात ‘गरमा गरम’वर थिरकली सोनाली कुलकर्णी
सध्या पावसाळ्यामुळे वातावरणात सर्वत्र गारवा आहे. त्यामुळे हे गारगार वातावरण थोडे उबदार करण्यासाठी ‘तमाशा लाईव्ह’ घेऊन येत आहे एक ‘गरमा गरमा’ गाणे. नुकतेच हे गाणे पुण्यातील गरवारे मेट्रो स्थानकात अनेक प्रवाशांच्या, चाहत्यांच्या उपस्थितीत प्रदर्शित करण्यात आले. या वेळी चित्रपटातील अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने आपल्या जबरदस्त नृत्याने उपस्थितांना घायाळ केले. तर या कार्यक्रमात अधिकच रंगत आणली ती, ‘गरमा गरम’च्या गायिका वैशाली सामंत यांनी. यावेळी चित्रपटाच्या संपूर्ण टीमसह प्रवाशांनीही ‘गरमा गरम’वर ठेका धरला. एकंदरच मेट्रो स्थानकात सगळे जण ‘फील दि हीट’ चा अनुभव घेत होते.
‘डान्स महाराष्ट्र डान्स’ पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार
झी मराठीवर लवकरच डान्स महाराष्ट्र डान्स लिटिल मास्टर्स हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ‘चिंचि चेटकीण’ या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातून खास स्पर्धक शोधून आणतेय. पण, या कार्यक्रमात परीक्षक कोण असणार हा प्रश्न सर्व प्रेक्षकांना पडला आहे. या कार्यक्रमात परीक्षकाच्या खुर्चीत एक हरहुन्नरी अभिनेता, डान्सर आणि कोरिओग्राफर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे आणि हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नाही तर गश्मीर महाजनी आहे. आपल्या अभिनय कौशल्यासोबतच गश्मीर एक उत्तम डान्सर आणि कोरिओग्राफर आहे हे सगळ्यांना माहिती आहे. म्हणूनच त्याला ‘डान्स महाराष्ट्र डान्स’मध्ये परीक्षकाच्या खुर्चीत पाहून प्रेक्षकांना खूप आनंद होईल यात शंकाच नाही.