TOP 10 Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या


जस्टिन बीबरची भयंकर आजाराशी झुंज! भारतातील दौरा रद्द होणार


आपल्या ‘बेबी’ गाण्याने सर्वांना वेड लावणारा गायक जस्टिन बीबर सध्या एका गंभीर आजाराशी झुंज देतो आहे. जस्टिन बीबर जगातील प्रसिद्ध पॉप गायकांपैकी एक आहे. अलीकडेच, गायकाने त्याच्या ‘जस्टिस’ या अल्बमच्या प्रमोशनसाठी जगातील अनेक देशांचा दौरा करण्याची घोषणा केली होती. मात्र, आता जस्टिनने काही दिवसांसाठी आपला दौरा पुढे ढकलला आहे. ही बातमी कळताच जगभरात पसरलेल्या त्याच्या चाहत्यांची निराशा झाली. मात्र, त्याने एक व्हिडीओ शेअर करत यामागचे कारण देखील सांगितले आहे. यातच त्याने आपल्या आजाराचा खुलासा केला आहे. या व्हिडीओमध्ये, जस्टिनने त्याच्या चेहऱ्याला अर्धा चेहरा अर्धांगवायू झाला असल्याचे सांगितले आहे. 


एका मैत्रीची अनोखी गोष्ट, ‘रूप नगर के चीते’ लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला!


कोणत्याही शब्दांच्या चौकटीत न मावणारं नातं म्हणजे ‘मैत्री’. रक्ताच्या नात्याच्या बंधापेक्षा मैत्रीच्या नात्याचे बंध अधिक घट्ट असतात. मैत्री ... ती तशी कोणाबरोबरही होते, अनेकदा आपल्याही नकळत. त्याला वय, भाषा, धर्म, वर्ण कशाचीही मर्यादा नसते. अशाच एका मैत्रीची अनोखी गोष्ट एका मराठी चित्रपटातून लवकरच आपल्या भेटीला येणार आहे. नाव आहे ... 'रूप नगर के चीते'!  नाव जरी हिंदी असलं, तरी चित्रपट मात्र मराठी आहे. येत्या 16 सप्टेंबरला 'रूप नगर के चीते' आपल्या भेटीला येतील.


'विक्रम वेधा'चे शूटिंग पूर्ण, हृतिक रोशनने शेअर केला सैफ अली खानसोबतचा खास फोटो!


बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनचा आगामी चित्रपट 'विक्रम वेधा' या वर्षातील बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे. आर माधवन आणि विजय सेतुपती यांच्या 'विक्रम वेधा'च्या हिंदी रिमेकची घोषणा झाल्यापासून लोक त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. त्याच वेळी, आता हा चित्रपट 30 सप्टेंबर 2021 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार असल्याची चर्चा सुरु आहे. या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले आहे. याबाबत माहिती देताना अभिनेता हृतिक रोशनने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.


गोला नाही तर लक्ष्य, मुलाच्या नावाचा भारती सिंहने केला खुलासा


विनोदवीर भारती सिंह नेहमीच तिच्या विनोदी शैलीने प्रेक्षकांची मनं जिंकत असते. भारती आणि हर्ष लिंबाचिया यांच्या घरी काही दिवसांपूर्वी नव्या पाहुण्याचे आगमन झाले. त्यांना 3 एप्रिल रोजी पुत्रप्राप्ती झाली. अद्याप भारतीने तिच्या मुलाचा चेहरा चाहत्यांना दाखवला नसला तरी मुलाच्या नावाचा खुलासा केला आहे. छोट्या पडद्यावरील विनोदवीर भारती सिंह तिच्या मुलाला प्रेमाने 'गोला' अशी हाक मारते. पण ‘ई-टाइम्स’च्या वृत्तानुसार भारतीने तिच्या मुलाचे नाव लक्ष्य असे ठेवले आहे.


दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुनच्या अडचणीत वाढ


अल्लू अर्जुनच्या अडचणीत वाढ झाली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, एका शैक्षणिक संस्थेला पाठिंबा दिल्याने अल्लू अर्जुनच्या अडचणीत वाढ झाली आहे. सामाजिक कार्यकर्ते कोठा उपेंद्र रेड्डी यांनी दावा केला की, दिशाभूल करणाऱ्या जाहीरातीत अल्लू अर्जुनने काम केले आहे. त्यामुळे दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते करत आहेत. 


नुसरत भरुचाच्या 'जनहित में जारी'ने रिलीजच्या पहिल्या दिवशी केली फक्त 43 लाखांची कमाई


नुसरत भरूचा आणि अनुद सिंह 'जनहित में जारी' हा सिनेमा नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. सिनेमा रिलीजच्या आधीपासूनच चर्चेत आहे. या सिनेमाने पहिल्याच दिवशी 43 लाखांची कमाई केली आहे. 


‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटातील नागार्जुनचा जबरदस्त लूक रिलीज


बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट यांचा आगामी चित्रपट 'ब्रह्मास्त्र' रिलीज होण्यापूर्वीच प्रचंड चर्चेत आहे. निर्माते सोशल मीडियावर चित्रपटाच्या स्टारकास्टचा फर्स्ट लूक शेअर करत आहेत. नुकताच अमिताभ बच्चन यांचा लूक समोर आला होता. आता निर्माता करण जोहरने या चित्रपटातील नागार्जुनचा फर्स्ट लूक शेअर केला आहे. या चित्रपटात नागार्जुन एका जबरदस्त लूकमध्ये दिसला आहे. या चित्रपटातून नागार्जुन पुन्हा एकदा हिंदी चित्रपटात दिसणार आहे.


'घरात टीव्ही देखील नव्हता, स्वत:च्या कमाईतून शिक्षण केलं पूर्ण : सोनाली बेंद्रे


बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली बेंद्रेनं नुकतीच एबीपी माझाच्या माझा कट्टा या कार्यक्रमामध्ये हजेरी लावली. सोनालीनं तिच्या बालणीचे काही किस्से सांगितले. तिनं सांगितलं की, तिचा स्वभाव हा फार हट्टी होता. तसेच सोनालीनं तिच्या कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीबाबत देखील सांगितलं. सोनाली म्हणाली, 'आमच्या घरामध्ये टिव्ही, मोबाईल, टेलिफोन या सर्व गोष्टी नव्हत्या. मी स्वत:च्या कमाईमधून माझं शिक्षणपूर्ण केलं. माझ्या वडिलांचा स्वभाव हा खूप कडक होता. मी मासिकांमधून आणि पुस्तकांमधून अभिनय आणि इतर गोष्टींबाबत माहिती घेत होते. आमच्या घरी फोन नसल्यानं माझ्या बहिणीच्या घरी ऑडिशनसाठी फोन येत असतं. त्यानंतर मी चित्रपटांसाठी ऑडिशन देत होते.'


'आठवणीतले निशि सर'... रंगणार 'रुईयांक' नाट्यमहोत्सव


 मुंबईतील रामनारायण रुईया स्वायत्त महाविद्यालय सांस्कृतिक उपक्रमांसाठी ओळखले जाते. एकांकिका स्पर्धांमध्ये रुईया नाट्यवलयचा दबदबा आहे. रुईया नाट्यवलयने मनोरंजन सृष्टीला अनेक अभिनेते, अभिनेत्री, दिग्दर्शक आणि तंत्रज्ञ दिले आहेत. अनेक एकांकिका स्पर्धा रुईया महाविद्यालयाने गाजवल्या आहेत. कोरोनामुळे एकांकिका स्पर्धा झाल्या नाहीत. पण आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने 'रुईयांक' हा नाट्यमहोत्सव होणार आहे. या महोत्सवाची खासियत म्हणजे हा महोत्सव निशिकांत कामत यांच्या आठवणीत रंगणार आहे. 


राजकुमार रावच्या आगामी 'हिट' सिनेमाचे मोशन पोस्टर रिलीज


'बधाई दो', 'बरेली की बर्फी', 'स्त्री', 'द व्हाइट टायगर' सारख्या सिनेमामुळे राजकुमार राव चर्चेत आहे. राजकुमारचे हे सिनेमे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले होते. आता सध्या राजकुमार राव 'हिट' सिनेमामुळे चर्चेत आला आहे. राजकुमारच्या आगामी सिनेमाचे नाव 'हिट- द फर्स्ट केस' असे आहे.  नुकतेच या सिनेमाचे मोशन पोस्टर रिलीज करण्यात आले आहे.