Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्यांचा घेतलेला आढावा.


पाच भारतीय भाषांमध्ये घुमणार शिवगर्जना ; 'हर हर महादेव' चित्रपट मराठीसह हिंदी, तामिळ, तेलगू, कन्नडमध्ये होणार प्रदर्शित


केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशभरात आणि जगात कुठेही असणाऱ्या मराठी माणसाला सतत प्रेरणा देणारं, ऊर्जा देणारं नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि या अखंड उर्जेला सतत प्रवाही ठेवणारी गोष्ट म्हणजे 'हर हर महादेव' ही शिवगर्जना! शिवाजी महाराजांचं कार्य त्यांची थोरवी याचं आकर्षण, कुतूहल आजही अनेकांच्या चर्चेचा, अभ्यासाचा विषय असतो. केवळ महाराष्ट्रातच नाही तर इतर भारतीय भाषिकही महाराजांच्या कार्यावर संशोधन करतात. महाराजांचा हाच महिमा भव्य दिव्य स्वरूपात सर्वांसमोर येणार आहे 'हर हर महादेव' या चित्रपटातून. आणि हा महिमा सर्वदूर पोहचावा यासाठीच या चित्रपटाची निर्मिती संस्था असलेल्या झी स्टुडिओजने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. 'हर हर महादेव' हा चित्रपट मराठीसह हिंदी, तामिळ, तेलगू आणि कन्नड या भाषांमध्ये एकाच दिवशी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.


शिवराज्याभिषेक दिनी 'वीर मुरारबाजी ...पुरंदरची युद्धगाथा' सिनेमाची घोषणा; 17 फेब्रुवारीला सिनेमा होणार प्रदर्शित


शिवराज्याभिषेक दिनी 'वीर मुरारबाजी ...पुरंदरची युद्धगाथा'  या सिनेमाची घोषणा करण्यात आली आहे. हा सिनेमा 17 फेब्रुवारीला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. नुकतेच या सिनेमाचे मोशन पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. पोस्टर प्रदर्शित झाल्याने प्रेक्षक सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. 


सम्राट पृथ्वीराज चित्रपटानं तीन दिवसांत केली कोट्यवधींची कमाई; जाणून घ्या विकेंडचे बॉक्स ऑफिस कलेक्शन


अक्षय कुमारचा आणि मानुषी छिल्लरचा सम्राट पृथ्वीराज हा चित्रपट शुक्रवारी (3 जून) रिलीज झाला. पहिल्या वीकेंडला बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. चित्रपटाने शुक्रवारी (3 जून) 10.70 कोटी रुपयांची कमाई केली होती, तर शनिवारी (4 जून) 12.50 कोटी रुपयांची कमाई केली. सम्राट पृथ्वीराजने आता रविवार (5 जून) रोजी 16 कोटी रुपयांची कमाई केली आहे. बॉक्स ऑफिसवर कमल हासनच्या विक्रम आणि मेजरशी टक्कर झाल्यामुळे सम्राट पृथ्वीराज चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर सुरुवात संथ झाली होती.


'आठवा रंग प्रेमाचा' सिनेमातील रिंकू राजगुरुचा लूक रिव्हील; ट्रेलर आऊट


काळ कितीही आधुनिक झाला, तरी स्त्रियांवरील अत्याचार हा सामाजिक प्रश्न आजही कायम आहे. स्त्रियांवरील अत्याचाराचा प्रश्नाबरोबरच एका प्रेमकहाणीवर आधारित 'आठवा रंग प्रेमाचा' या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. 17 जूनला प्रदर्शित होणाऱ्या या सिनेमात रिंकू राजगुरूनं अॅसिड व्हिक्टिमची भूमिका करत पहिल्यांदाच प्रोस्थेटिक मेकअप केला आहे.   


कमल हासनच्या 'विक्रम'चा महाविक्रम; तीन दिवसांत केली 160 कोटींची कमाई


कमल हासनचा 'विक्रम' सिनेमा नुकताच सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. रिलीजच्या तीन दिवसांतच या सिनेमाने जगभरात 160 कोटींची कमाई केली आहे. या सिनेमाने रिलीज आधीच 200 कोटींची टप्पा पार केला होता. जगभरात बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा धुमाकूळ घालत आहे. 'विक्रम' सिनेमा 3 जून 2022 ला सिनेमागृहात प्रदर्शित झाला होता. 


टॉम क्रूझच्या 'Top Gun Maverick' सिनेमाची रेकॉर्डब्रेक कमाई


टॉम क्रूझचा 'टॉप गन मॅव्हरिक' हा सिनेमा रिलीजच्या दुसऱ्या आठवड्यातदेखील सिनेमागृहात धुमाकूळ घालतो आहे. बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने चांगलाच धमाका केला आहे. या सिनेमाने जगभरात आतापर्यंत 4 हजार 284 कोटींची कमाई केली आहे.


150 कोटींच्या क्लबमध्ये भूल भुलैय्या-2 झाला सामील


बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता कार्तिक आर्यन आणि कियारा आडवाणी यांच्या भूल भुलैय्या-2  या चित्रपटाचा 150 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला आहे. हा चित्रपट रिलीज होऊन तीन आठवड्यापेक्षा जास्त दिवस झाले. पण तरीही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. हा चित्रपट एवढा कमी वेळेत 150 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला आहे त्यामुळे आता लवकरच हा चित्रपट 200 कोटींचा टप्पा पार करेल, असा अंदाज लावला जातोय. 


'धूप पानी बहने दे' केके यांचं शेवटचं गाणं रिलीज; चाहते झाले भावूक


गायक केके यांची अनेक गाणी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अशातच केके यांचं शेवटचं गाणं 'धूप पानी बहने दे' हे नुकतच प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. 'धूप पानी बहने दे' हे गाणं ऐकून चाहते भावूक झाले आहेत. 


जुग जुग जिओ' सिनेमातील 'रंगीसारी' गाणं रिलीज


बॉलिवूड अभिनेता वरुण धवन, कियारा आडवाणी, नीतू कपूर आणि अनिल कपूरच्या 'जुग जुग जिओ' या सिनेमाची प्रेक्षक प्रतीक्षा करत आहेत. सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. आता सिनेमातील 'रंगसारी' हे गाणं रिलीज झाले आहे. या गाण्यात वरुण धवन आणि कियारा आडवाणी रोमॅंटिक अंदाजात दिसत आहेत. या गाण्याला तीन लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. 


जगण्यासोबत मरणाचाही आनंदोत्सव करण्याचा कानमंत्र देणारा ‘फनरल’


‘फनरल’ हा सिनेमा 10 जूनला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. ‘फनरल’ चित्रपटात आरोह वेलणकर, तन्वी बर्वे, विजय केंकरे, संभाजी भगत, प्रेमा साखरदांडे, हर्षद शिंदे, पार्थ घाटगे, सिद्धेश पुजारे मुख्य भूमिकेत आहेत.