TOP 10 Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या -


अलविदा केके... गायक केके अनंतात विलीन


कृष्णकुमार कुननाथ म्हणजेच केके हे अनंतात विलीन झाले आहेत. केके यांच्यावर वर्सोवा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. केके यांच्या मुलाने त्याच्या वडिलांना मुखाग्नी दिला आहे.  केके यांच्या अखेरच्या प्रवासात 'केके अमर रहे'च्या घोषणाही देण्यात आल्या. यावेळी गायक केके यांना अखेरचा निरोप देण्यासाठी आणि श्रद्धांजली वाहण्यासाठी अनेक सेलिब्रिटी आले होते. अभिजित भट्टाचार्य, श्रेया घोषाल, जावेद अली, सलीम मर्चंट यांच्यासह केके यांचे अनेक मित्र आणि इंडस्ट्रीतील कलाकार, गायक केके यांना अखेरचा निरोप देण्यासाठी आणि श्रद्धांजली वाहण्यासाठी पोहचले होते. तसेच कबीर खान, सुलेमान, शंतनु मोहित्रा, अल्का याग्निक, गीतकार समीर, जतीन पंडीतसारखे संगीत विश्व आणि चित्रपटसृष्टीतील मंडळी केके यांच्या निवासस्थानी त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी दाखल झाले होते. 


'सरसेनापती हंबीरराव चित्रपट सरकारने टॅक्स फ्री करावा'; मुंबई डबेवाला असोसिएशनची मागणी


महाराष्ट्र राज्यात उध्दव ठाकरे सरकारने सरसेनापती हंबीरराव हा चित्रपट टॅक्स फ्री करावा अशी मागणी 'मुंबई डबेवाला असोसिएशन'चे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी महाराष्ट्र राज्य सरकारकडे केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर छत्रपती संभाजी महाराज यांना शेवटच्या श्वासापर्यंत साथ देणारे सरसेनापती हंबीरराव मोहीते यांची शौर्यगाथा या चित्रपटाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर आली आहे.  


‘येरे येरे पावसा’ सिनेमाचा चिंब करणारा ट्रेलर प्रदर्शित


एका छोटयाशा दुर्गम खेडेगावातल्या चिमुकल्यांनाही या पावसाची अशीच प्रतिक्षा आहे. त्यासाठी ते आभाळाकडे डोळे लावून बसले आहेत. त्यांच्या आशा निराशेच्या खेळाची रंगतदार गोष्ट म्हणजे ‘येरे येरे पावसा’ हा मराठी सिनेमा. आशावादाच्या सरी घेऊन या सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. येत्या 17 जूनला चित्रपटगृहांत मनसोक्त भिजवायला हा पाऊस सज्ज झाला आहे. या सिनेमाची निर्मिती शारीक खान यांची असून दिग्दर्शन शफक खान यांनी केलं आहे.


केजीएफचे 50 दिवस पूर्ण; उद्यापासून रॉकी भाई ओटीटीवर राज्य करणार


 'केजीएफ 2' हा सिनेमा सध्या सिनेमागृहात धुमाकूळ घालत आहे. या सिनेमा रिलीज होऊन 50 दिवस पूर्ण झाले आहेत. 14 एप्रिलला प्रदर्शित झालेल्या यशच्या 'केजीएफ 2' सिनेमाने जगभरात 1,235 कोटींची कमाई केली आहे. आता रॉकी भाई ओटीटीवर राज्य करणार आहे. 'केजीएफ 2' हा सिनेमा आता ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. 


प्रसिद्ध संतूर वादक पंडित भजन सोपोरी यांचे निधन


जगप्रसिद्ध संतूर वादक पंडित भजन सोपोरी यांचे निधन झाले आहे. वयाच्या 74 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या अनेक दिवसांपासून संतूर वादक पंडित भजन सोपोरी आजारी होते. गुरुग्राममधील फोर्टिस रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. 


‘व्हॅक्यूम क्लीनर’ नाटकाचा रंगणार विनामुल्य सन्मान प्रयोग


मराठी चित्रपट व नाट्यसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी यंदा वयाची पंचाहत्तरी पूर्ण केली असून त्यांच्या चित्रपटसृष्टीतील कारकिर्दीला पन्नास वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्ताने शनिवारी 4 जूनला दादरच्या शिवाजी मंदिरात अशोक सराफ यांच्या ‘व्हॅक्यूम क्लीनर’  या नाटकाचा खास प्रयोग रंगणार आहे. या प्रयोगाच्या मध्यांतरात अशोक सराफ यांचा विशेष सन्मान केला जाणार आहे.


उत्तरप्रदेशनंतर मध्यप्रदेशमध्येदेखील 'सम्राट पृथ्वीराज' करमुक्त होणार; शिवराज सिंह चौहन यांची माहिती


मध्यप्रदेश सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. मध्यप्रदेश सरकारने बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा 'सम्राट पृथ्वीराज'  हा सिनेमा करमुक्त करण्याची घोषणा केली आहे. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान (Shivraj Singh Chouhan) यांनी ट्वीट करत यासंदर्भात माहिती दिली आहे.


'कोण होणार करोडपती' 6 जूनपासून होणार सुरू


'कौन बनेगा करोडपती' या कार्यक्रमाची प्रेक्षकांमध्ये चांगलीच क्रेझ आहे. 'कौन बनेगा करोडपती'नंतर 'कोण होणार करोडपती' हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. आता पुन्हा एकदा हा बहुचर्चित कार्यक्रम 6 जूनपासून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.  


विक्रम चित्रपटासाठी कमल हसननं घेतलं कोट्यवधींचे मानधन


चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध  कमल हासनचा 'विक्रम' (Vikram) हा चित्रपट तीन जून रोजी रिलीज होणार आहे. विक्रम हा चित्रपट तमिळ भाषेबरोबरच हिंदी भाषेमध्ये देखील रिलीज होणार आहे. कमल हसनचे या चित्रपटाची वाट उत्सुकतेने पाहात आहेत. चित्रपटानं रिलीज होण्यापूर्वीच 200 कोटींची कमाई केली आहे. अॅडव्हान्स बुकिंग आणि ओटीटी राइट्मधून या चित्रपटानं एवढी कमाई केली आहे.विक्रम या चित्रपटामध्ये कमल हसन हे प्रमुख भूमिका साकारणार आहेत. तसेच ते या चित्रपटाचे निर्माते देखील आहे. या चित्रपटामध्ये काम करण्यासाठी कमल हसन यांनी 50 कोटी मानधन घेतलं आहे. 


बॉक्स ऑफिसवर 'भूल भुलैया 2'चा दबदबा


बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनचा 'भूल भुलैया 2' हा सिनेमा दुसऱ्या आठवड्यातदेखील बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई करत आहे. या सिनेमा लवकरच 150 कोटींचा टप्पा पार करणार आहे. रिलीजच्या तेराव्या दिवशी या सिनेमाने 4.45 कोटींचा गल्ला जमवला आहे. तर आतापर्यंत या सिनेमाने 150 कोटींची कमाई केली आहे.