TOP 10 Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या -
केतकी चितळेला 18 मे पर्यंत पोलीस कोठडी
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांबाबत आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट करणाऱ्या अभिनेत्री केतकी चितळेच्या अडचणीत वाढ झाली आहे. केतकी चितळेला 18 मे पर्यंत पोलीस कस्टडी सुनावण्यात आली आहे. कोर्टात केतकीने वकील घेतला नाही, तिनं स्वतः कोर्टात युक्तिवाद केला. सकाळी केतकी हिला सुट्टीच्या न्यायालयात हजर करण्यात आले. या पोस्टबाबत अधिक तपास करण्यासाठी कस्टडीची आवश्यकता असल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली. ठाणे गुन्हे शाखेने 5 दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाकडे मागितली. गोरेगाव पोलीस स्टेशनचे अधिकारी देखील केतकीचा ताबा घेण्यासाठी ठाणे कोर्टात हजर झालेले आहेत.
वेब विश्वाला हादरवून टाकणारा 'रानबाजार'
'रेगे', 'ठाकरे' असे ज्वलंत, संवेदनशील विषय हाताळणारे दिग्दर्शक अभिजित पानसे पुन्हा एकदा एक नवीन विषय घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज झाले आहेत. 'रानबाजार' असे नाव असलेल्या या भव्य वेब सिरीजची निर्मिती प्लॅनेट मराठी, अ व्हिस्टास मीडिया कॅपिटल कंपनीने केली असून, नुकतेच या वेब सिरीजचे पोस्टर सोशल मीडियावर झळकले आहे.
आर्यन खान सोशल मीडियावर बॅक
शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानने सहा महिन्यांनंतर त्याची पहिली पोस्ट शेअर केली आहे. आर्यनने खास सुहाना खानसाठी पोस्ट शेअर केली आहे. सुहाना खान झोया अख्तरच्या 'द आर्चीज' या सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. त्यामुळे आर्यन खानने सुहानाला शुभेच्छा देणारी पोस्ट शेअर केली आहे.
'धर्मवीर'ची भुरळ मुख्यमंत्र्यांनाही
‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ हा सिनेमा प्रदर्शनापूर्वी आणि प्रदर्शनानंतर नव नवे विक्रम करत आहे. सिनेमा प्रदर्शित झाल्यापासून प्रेक्षक या सिनेमाला चांगला प्रतिसाद देत आहेत. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ हा सिनेमा पाहायला गेले आहेत. आयनॉक्समध्ये खास मुख्यमंत्र्यांसाठी खास शोचे आयोजन करण्यात आले आहे. पत्नी रश्मी ठाकरे आणि नगरविकासमंत्री तसेच ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदेदेखील उपस्थित आहेत.
सिद्धार्थ मल्होत्राला शूटिंगदरम्यान दुखापत
बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. आता सिद्धार्थ मल्होत्राने रोहित शेट्टीसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये सिद्धार्थ मल्होत्राला दुखापत झालेली दिसत आहे. यामुळे सिद्धार्थचे चाहते नाराज झाले आहेत. सिद्धार्थने शेअर केलेला हा फोटो रोहित शेट्टीच्या 'इंडियन पुलिस फोर्स' या वेब सीरिज दरम्यानचा आहे.
बंगाली अभिनेत्री पल्लवी डे चे निधन
गाली मनोरंजनसृष्टीतून एक वाईट बातमी समोर आली आहे. बंगाली अभिनेत्री पल्लवी डे हिने गळफास घेत आत्महत्या केली आहे. पल्लवीने वयाच्या विसाव्या वर्षी तिचं जीवन संपवलं आहे. पल्लवीने आत्महत्या केल्यामुळे तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
‘कभी ईद कभी दिवाली’च्या शूटिंगला सुरुवात
बॉलिवूड अभिनेता सलमान खानने त्याच्या आगामी 'कभी ईद कभी दिवाली’ या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. सलमानने एका सिनेमाच्या शूटिंगदरम्यानचा फोटो शेअर करत चाहत्यांना सिनेमाचे शूटिंग सुरू झाल्याची माहिती दिली आहे. पण हा फोटो ‘कभी ईद कभी दिवाली’ या सिनेमाच्या शूटिंगदरम्यानचा आहे, असे अद्याप दबंग खानने जाहीर केलेले नाही. रिपोर्टनुसार, ‘कभी ईद कभी दिवाली’ या सिनेमाच्या शूटिंगला मुंबईत सुरुवात झाली आहे. पूजा हेगडेनेदेखील एक फोटो शेअर करत यासंदर्भात माहिती दिली होती.
भारतीय बॅडमिंटन संघाची ऐतिहासिक कामगिरी, तापसीचा बॉयफ्रेंड आहे संघाचा कोच
बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. तिची मतं ती सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त करत असते. आता तापसीने भारतीय पुरुष भारतीय बॅडमिंटन संघाचे जाहीर कौतुक केलं आहे. तापसीने सोशल मीडियावर भारतीय बॅडमिंटन संघाचा व्हिडीओ शेअर केला आहे. भारतीय बॅडमिंटन संघाचा कोच तापसीचा बॉयफ्रेंड आहे.
पहिल्या गाण्याला मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर 'इर्सल'चं दुसरं गाणं होणार प्रदर्शित
'इर्सल' सिनेमाचे पहिले पोस्टर प्रदर्शित झाल्यापासून प्रेक्षक या सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. 'इर्सल' सिनेमातील 'या बया दाजी आलं' हे पहिलं गाणं गेल्या काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आलं होतं. या गाण्याला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला होता. महाराष्ट्राला वेडं लावणारी महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री, नृत्यांगना माधुरी पवारने या गाण्याने तमाम दाजींना घायाळ केलं होतं. आता या सिनेमातील 'निशिगंध तुझ्या प्रीतीचा' हे गाणं प्रदर्शित होणार आहे.
केतकी चितळेला अपस्मारचा आजार
सध्या अभिनेत्री केतकी चितळे तिच्या वादग्रस्त पोस्टमुळे चर्चेत आली आहे. या पोस्टमुळे अभिनेत्रीला अटक झाली आहे. या आधी केतकी तिला असेलल्या एका आजारामुळे चर्चेत आली होती. हा आजार आहे अपस्मार. अपस्मार म्हणजे वारंवार फिट येणं. या आजाराला ‘एपिलेप्सी’ देखील म्हणतात. या आजारावर उपचार शक्य आहेत. औषधांनी रुग्ण बरा न झाल्यास शस्त्रक्रिया देखील करता येते. एकूण लोकसंख्येच्या एक टक्के इतक्या लोकांनाच या आजाराची लागण झालेली आहे.