TOP 10 Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या -


माजी पोलीस आयुक्त राकेश मारियांचा बायोपिक येणार!


‘सिंघम’, ‘सिम्बा’, ‘सूर्यवंशी’सारख्या ‘कॉप’ चित्रपट तयार करणारा बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टी आता खऱ्याखुऱ्या पोलीस अधिकाऱ्याच्या आयुष्यावर आधारित चित्रपट बनवणार आहे. रोहित शेट्टी याने नुकतीच त्याच्या आगामी सिनेमाची घोषणा केली आहे. माजी पोलीस आयुक्त राकेश मारिया यांच्या आयुष्यावर आधारित बायोपिकचे दिग्दर्शन रोहित शेट्टी करणार आहे. 


मनोज वाजपेयींच्या हस्ते 'भारत माझा देश आहे'चा ट्रेलर प्रदर्शित!


त माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत...’ ही प्रतिज्ञा अगदी बालपणापासूनच आपल्या मनावर कोरली गेली आहे. अनेकांच्या भावना या प्रतिज्ञेशी जोडल्या गेल्या आहेत. या भावनेशी जोडलेली अशीच एक संवेदनशील कथा आपल्या समोर आणण्याचा प्रयत्न दिग्दर्शक पांडुरंग कृष्णा जाधव यांनी 'भारत माझा देश आहे'  या चित्रपटातून केला आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर मनोज वाजपेयी यांनी प्रदर्शित केला आहे. 


Jacqueline Fernandez वर ईडीची मोठी कारवाई


अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसवर मोठी कारवाई केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुकेश चंद्रशेखर प्रकरणात ईडीने जॅकलिनची 7 कोटी 12 लाख रुपयांची जंगम आणि स्थावर मालमत्ता जप्त केली आहे. मनी लॉण्ड्रिंग प्रकरणात ईडीने ही कारवाई केली आहे.


'हीरोपंती 2' सिनेमाने रिलीजच्या पहिल्याच दिवशी केली कोट्यवधींची कमाई


अ‍ॅक्शन हिरो' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या टायगर श्रॉफचा 'हीरोपंती 2' हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला आहे. रिलीजच्या पहिल्याच दिवशी या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या सिनेमाने पहिल्याच दिवशी कोट्यवधींची कमाई केली आहे. 'हीरोपंती 2' या सिनेमाने रिलीजच्या पहिल्या दिवशी आठ कोटींची कमाई केली आहे.


'मिर्झापूर'चा तिसरा सीझन लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला


'मिर्झापूर'चे आतापर्यंत दोन सीझन प्राईम व्हिडीओवर प्रदर्शित झाले आहेत. या दोन्ही सीझनने प्रचंड प्रसिद्धी मिळवली आहे. प्रेक्षक आता या वेब सीरिजच्या तिसऱ्या सीझनची प्रतीक्षा करत आहेत. लवकरच 'मिर्झापूर'चा तिसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रसिका दुग्गलने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत यासंदर्भात माहिती दिली आहे. 


'शेर शिवराज' प्राइम टाईमला दाखवावा; प्रेक्षकांची मागणी


दिग्पाल लांजेकरांचा 'शेर शिवराज' हा सिनेमा 22 एप्रिलला सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. या सिनेमाच्या माध्यमातून अफजलखानाच्या वधाचा थरार प्रेक्षकांना अनुभवता येत आहे. दरम्यान हा सिनेमा प्राइम टाईमला दाखवावा, यासाठी प्रेक्षक मागणी करत आहेत. 


'द कश्मीर फाइल्स'ने सिनेमागृहात 50 दिवस केले पूर्ण


'द कश्मीर फाइल्स' या सिनेमाने सिनेमागृहात 50 दिवस पूर्ण केले आहेत. विवेक अग्निहोत्रींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून यासंदर्भात माहिती दिली आहे. जगभरात या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या सिनेमाने जगभरात बॉक्स ऑफिसवर 339.49 कोटींची कमाई केली आहे.


‘धर्मवीर’ चित्रपटाचा दुसरा भाग येणार, माझा कट्ट्यावर बोलताना प्रसाद ओक म्हणाला...


धर्मवीर या चित्रपटात आनंद दिघे यांची भूमिका साकारणारा अभिनेता प्रसाद ओक म्हणाला आहे की, दिघे साहेबांमध्ये कोणते कोणते गुण होते, हे दाखवण्यासाठी या चित्रपटाचा हा एक भाग अपुरा आहे. त्यामुळे हा चित्रपट अजून आला पण नाही, मात्र आमच्या मनात याच्या दुसऱ्या भागाची तयारी देखील सुरू झाली आहे. 


मे महिन्यात प्रेक्षकांसाठी असणार मनोरंजनाचा अधिक मास


मे महिन्यात प्रेक्षकांसाठी मनोरंजनाचा अधिक मास असणार आहे. आता सोमवार ते शनिवारच नाही तर रविवारी सुद्धा प्रेक्षक आपल्या आवडत्या मालिका पाहू शकतील. त्यामुळे आता रविवारीसुद्धा 'होम मिनिस्टर', 'मन झालं बाजींद', 'मन उडू उडू झालं','तू तेव्हा तशी', 'माझी तुझी रेशीमगाठ' आणि 'तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं' या मालिका प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे आता मनोरंजनाला आता सुट्टी नाही.


'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिका आता सिनेमाद्वारे येणार प्रेक्षकांच्या भेटीला


'स्वराज्यरक्षक संभाजी' ही मालिका आता सिनेमाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. छोट्या पडद्यावर ही मालिका प्रचंड गाजली होती. त्यामुळे आता सिनेमासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. आता 'स्वराज्यरक्षक संभाजी' या सिनेमाचा पहिला भाग प्रेक्षकांना 1 मे रविवारी दुपारी 12 वाजता प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.