मुंबई : 'द लायन किंग' प्रदर्शित झाला आणि सगळ्या बच्चेकंपनीमध्ये उत्साहाचं उधाण आलं. म्हणूनच अवघ्या दोन दिवसांच्या सुट्टीत या चित्तरपटाने तब्बल 55 कोटींचा गल्ला जमवला आहे. या चित्रपटात मुफासाला आवाज दिला होता तो शाहरुख खानने. तर सिंबाला आवाज दिला होता आर्यन खानने. हा सिनेमा यायच्या आधी या दोघाचं खूप कौतुक झालं. आर्यनच्या आवाजाबद्दल कमालीची उत्सुकता होती. सिनेमा रिलीज झाला आणि आर्यनसह आणखी दोन माणसांचं खूप कौतुक झालं. एक होता पुंबा आणि दुसरा होता टिमॉन. पुंबाला आवाज दिलाय संजय मिश्राने. तर टिमॉन झाला आपला मराठमोळा श्रेयस तळपदे. श्रेयसने सगळ्यात आधी एबीपी माझाशी संवाद साधला. टिमॉन करायला त्याला मजा आलीच. पण त्याहीपेक्षा गमतीदार बाब अशी की सहज गुणगुणत असणाऱ्या श्रेयसचा आवाज लक्षात घेऊन त्याला थेट गाण्याची संधी मिळाली, ते होतं 'हकुना मटाटा'. या डबिंगचे अनेक किस्से श्रेयसने खास एबीपी माझाशी शेअर केले.
टिमॉनबद्दल बोलताना श्रेयस म्हणाला, "मला आधी एक अनोळखी नंबरवरुन फोन आला होता. मी घेतला आणि माझ्याकडे लायन किंगच्या डबिंगची विचारणा झाली. मला सुरुवातीला वाटलं कोणीतरी माझी चेष्टा करत आहे. पण तसं नव्हतं. तो खरा फोन होता. कारण माझ्या नावाची सूचना केली होती मेघना एरंडेने. शिवाय त्याच्या बोलण्यात मोनिका शेट्टी यांचंही नाव आलं. डबिंग क्षेत्रात या दोघींचंही मोठं नाव आहे. मग त्यातलं गांभीर्य मला जाणवलं. मला त्यांनी फिल्म दाखवली. बकायदा मी दहा मिनिटाची छोटी ऑडिशन दिली आणि त्यानंतर माझं सिलेक्शन झालं, श्रेयस सांगत होता.
लायन किंगमध्ये टिमॉनचा आवाज देताना त्याला अनेक गमतीजमती कराव्या लागल्या. यात मुंबईय्या हिंदी भाषा वापरतानाच ती मुलांना कळावी शिवाय नेटकी असण्याकडे त्याने भर दिला. यातल्या गाण्याचा किस्सा सांगताना तो म्हणाला, 'हकुना मटाटा' या गाण्याची तालीम सुरु होती. मी बाहेर बसलो होतो. लहान मुलाचा गाण्याचा आवाज येत होता. म्हणून मी गुणगुणू लागलो. तर मलाही गाण्याची ऑडिशन द्यायचा आग्रह झाला. मी कधीच गायलो नव्हतो. मी तर बाथरुम सिंगर होतो. पण मी ते गाऊन दाखवलं आणि टिमॉनला गाणं मिळालं. त्याचा खूप प्रतिसाद मला मिळाला.
श्रेयसला बॉलिवूडकढून खूपच सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. शाहरुख खानने तर ट्विटरवरुन त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. शिवाय अनेक कलाकार, दिग्दर्शकांकडून त्याच्या कामाचं कौतुक होतं आहे. यावर बोलताना श्रेयस म्हणतो, मी 'ओम शांती ओम' केला तेव्हा त्याच्या मित्राची भूमिका केली होती. आणि आता या सिनेमात मी त्याच्या मुलाच्या मित्राची भूमिका करतो आहे.
'द लायन किंंग' आता प्रदर्शित झाला आहे. आशिष विद्यार्थी, संजय मिश्रा, शाहरुख खान, आर्यन खान यांच्यासह श्रेयस तळपदे हे नाव आता लहान मुलांच्या ओठी रुळू लागलं आहे. हा चित्रपट केल्याने श्रेयसच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा रोवला गेला आहे.