मुंबई : आमीर खान आणि अमिताभ बच्चन यांची मुख्य भूमिका असलेला 'ठग्ज ऑफ हिंदोस्तान' हा चित्रपट पाहून प्रेक्षकांची निराशा झाली. पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी सिनेमाला उतरती कळा लागली आहे. दुसऱ्या दिवशाची कमाई जवळपास निम्म्यावर आली आहे.

'ठग्ज ऑफ हिंदोस्तान'ने पहिल्या दिवशी (गुरुवार 8 नोव्हेंबर) हिंदी भाषेत 50.75 कोटी कमावले, तर तामिळ-तेलुगू मिळून अडीच कोटींची कमाई केली. अशाप्रकारे पहिल्या दिवसात एकूण 52.25 कोटी रुपयांचा गल्ला जमा झाला आहे. शुक्रवारी मात्र 'ठग्ज..'ला केवळ 28.25 कोटी रुपयेच कमावता आले. गुरुवार आणि शुक्रवार असे दोन्ही दिवस मिळून 'ठग्ज'ने 81.5 कोटी रुपयांचा गल्ला जमवला.


'ठग्ज ऑफ हिंदोस्तान' देशभरात पाच हजार स्क्रीन्सवर झळकला. पहिल्या दिवसाची कमाई पाहून हा सिनेमा दुसऱ्याच दिवशी शंभर कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश करेल, असे ठोकताळे बांधले जात होते.

दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे 'ठग्ज'च्या कलेक्शनमध्ये घसरण झाल्याचं चित्रपट ट्रेड अॅनलिस्ट तरण आदर्श यांनी ट्विटरवर म्हटलं आहे. भाऊबीजेमुळे या प्रेक्षक सिनेमागृहात गेले नसतील, मात्र ही तूट शनिवार-रविवारी भरुन निघेल, असं म्हटलं जात आहे. मात्र समीक्षकांचे वाईट रिव्ह्यू आणि प्रेक्षकांच्या निगेटिव्ह माऊथ पब्लिसिटीचा फटका सिनेमाला बसल्याचा अंदाज आहे.


खुद्द तरण आदर्श यांनीही दोन स्टार देत सिनेमा निराशाजनक असल्याचं सांगितलं होतं. तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी (शनिवार-रविवार) सिनेमाने चांगली कामगिरी केली नाही, तर सोमवारपासून 'ठग्ज..'चं भवितव्य अंधारात असल्याचं भाकितही तरण आदर्श यांनी वर्तवलं.


प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी 50 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडणारा 'ठग्ज...' हा बाहुबलीनंतरचा दुसरा भारतीय चित्रपट ठरला आहे. 2018 मधील सर्वाधिक ओपनिंग मिळवलेला हा सिनेमा आहे.

दुसरीकडे मराठी प्रेक्षकांनी आपला मोर्चा 'आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर' चित्रपटाकडे वळवला आहे. त्यामुळे 'काशिनाथ' चांगली कमाई करेल, अशी आशा आहे.