कोल्हापूर: दिग्दर्शक संजय लिला भन्साळी यांच्या ‘पद्मावती’ या चित्रपटाचं चित्रीकरण सध्या कोल्हापूरमध्ये सुरु आहे. काही दिवसांपूर्वी या कोल्हापूरमध्ये या चित्रपचटाचा सेट जाळण्याचा काही जणांनी प्रयत्न केला होता. या घटनेला काही दिवस उलटत नाही तोच काल मध्यरात्री सांगलीच्या तीन तरुणांनी मद्यप्राशन करुन शुटींग सुरु असलेल्या ठिकाणी बराच धिंगाणा घातला.
पद्मावती चित्रपटाच्या चित्रीकरणस्थळी काल मध्यरात्री सांगलीच्या तीन युवकांनी मद्यप्राशन करुन धिंगाणा घातला. यावेळी या तीन तरुणांनी सुरक्षा रक्षकाला मारहाण करून गाडी चित्रीकरणस्थळी नेण्याचा प्रयत्नही केला.
हा धिंगाणा सुरु असल्याचं लक्षात येताच म्हाळुंगे गावातील ग्रामस्थ आणि सेटवरील सुरक्षा रक्षकांनी या तीनही तरुणांना पकडून चांगलाच चोप दिला. गौरव सातपुते, सिद्धार्थ शेडगे, विश्वेश खोलाडकर अशी या तरुणांची नावं असून या तिघांनाही पन्हाळा पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी कोल्हापूरमध्ये पद्मावती चित्रपटाचा सेट जाळण्याचा प्रयत्न झाला होता. तसेच काही वाहनांवर दगडफेकही करण्यात आली होती. तर याआधी राजस्थानमध्ये या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान करणी सेनेने संजय लिला भन्साळी यांना मारहाण केली होती. तसंच शूटिंग करण्यास मनाई केली होती. सिनेमात राणी पद्मावती यांची प्रतिमा आणि इतिहास चुकीच्या पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करणी सेनेने केला होता.
पद्मावती सिनेमात दीपिका पादूकोण, शाहिद कपूर आणि रणवीर सिंह प्रमुख भूमिकेत आहेत. 17 नोव्हेंबर 2017 रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. सिनेमात दीपिका राणी पद्मावती तर रणवीर सिंह अल्लाउद्दीन खिलजीच्या भूमिकेत आहेत.
संबंधित बातम्या:
आरशाद्वारे मुखदर्शन देणारी राणी पद्मावती कोण होती?
भन्साळी मुंबईला परतणार, ‘पद्मावती’चं शूटिंग रद्द
जयपूरमध्ये दिग्दर्शक संजय लीला भन्साळींना मारहाण
भन्साळींच्या समर्थनार्थ सुशांतने ‘राजपूत’ आडनाव हटवलं
कोल्हापुरात 'पद्मावती'चा सेट जाळला