मुंबई : अभिनेत्री प्रियांका चोप्राने नुकतंच थाटामाटात लग्न केलं. मात्र प्रियांकाचं लग्न म्हणजे स्कॅम आहे, निक जोनासच्या इच्छेविरोधात लग्न करत प्रियांकाने त्याला फसवलं, असा आरोप अवघ्या काही दिवसातच होऊ लागला. नुकत्याच पार पडलेल्या या शाही लग्नामागची धक्कादायक गोष्ट अमेरिकेतल्या 'द कट' नावाच्या मासिकात छापून आली आणि मनोरंजन विश्वात एकच खळबळ उडाली.
मारिया स्मिथ नावाच्या पत्रकाराने हे आर्टिकल लिहिलं आहे. या लेखात तिने प्रियांका चोप्रावर गंभीर आरोप केले आहेत. प्रियांका चोप्रा केवळ पैशांच्या मागे धावणारी अभिनेत्री आहे. निकसोबत तिचा झालेला विवाह हासुद्धा त्याचाच एक भाग आहे. निकला प्रियांकाशी अजिबात लग्न करायचं नव्हतं, पण प्रियांकाने ते सगळं जबरदस्तीने घडवून आणलं, असा दावा या लेखात करण्यात आला होता.
गंभीर बाब म्हणजे हे धडधडीत आरोप करताना मारियाने कसलेच पुरावे दिलेले नाहीत. त्यामुळे या हवेतल्या गोष्टी जेव्हा छापून आल्या, तेव्हा जगभरातून त्यावर जबरदस्त टीका झाली. निक जोनासचा भाऊ, त्याची होणारी बायको आणि आघाडीची अभिनेत्री सोफिया टर्नर, सोनम कपूर अशा अनेकांनी ट्वीटरवर या लेखाचा आणि 'द कट'चा निषेध नोंदवला.
सोशल मीडियावरुन अशा तिखट प्रतिक्रिया आल्यावर 'द कट'ने हे आर्टिकल वेबसाईटवरुन काढून टाकलं आणि घडल्या प्रकाराबद्दल सपशेल माफी मागितली. यावर थेट प्रियांकाला जेव्हा विचारण्यात आलं, तेव्हा तिने आपण अशा गोष्टींकडे अजिबात लक्ष देत नसल्याची प्रतिक्रिया दिली. नव्या आयुष्याची सुरुवात करत असताना झालेली ही चिखलफेक तिला कुठेतरी सलत असणार, हे नक्की.