Tendlya Marathi Movie : 'सचिन' म्हटलं की डोळ्यासमोर येतं खचाखच भसलेलं स्टेडियम आणि 'सचिन...सचिन...'चा तो नारा. सामान्य कुटुंबात जन्माला आलेल्या सचिनने (Sachin Tendulkar) प्रत्येकाला स्वप्न बघायला शिकवलं. सचिनच्या या गोष्टीने प्रेरित होऊन त्याच्या एका चाहत्यानेदेखील सिनेमा बनवण्याचं स्वप्न पाहिलं. सचिनप्रमाणेच सचिन जाधव (Sachin Jadhav) या चाहत्याचंदेखील स्वप्न साकार झालं आहे. सचिन जाधवचा 'तेंडल्या' (Tendlya) हा मराठी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
गावाकडच्या मंडळींसाठी क्रिकेट हा खेळ किती महत्त्वाचा आहे? त्यांचं या खेळावर किती प्रेम आहे? सचिन तेंडुलकर त्यांच्यासाठी कसा प्रेरणादायी आहे? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं देणारा 'तेंडल्या' हा सिनेमा आहे. 'तेंडल्या' या सिनेमाची झलक आता समोर आली आहे. सचिन तेंडुलकरचा नुकताच वाढदिवस झाला असून 'तेंडल्या' या सिनेमाचा सर्वेसर्वा सचिन जाधवने त्याला या सिनेमाची भेट दिली आहे.
'तेंडल्या' कधी होणार प्रदर्शित? (Tendlya Release Date)
'तेंडल्या' हा मराठी सिनेमा येत्या 5 मेला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'तेंडल्या' या सिनेमाची घोषणा झाल्यापासून हा सिनेमा चर्चेत आहे. या सिनेमाला एक राष्ट्रीय पुरस्कार आणि पाच राज्य पातळीवरील पुरस्कार मिळाले आहेत. सचिन तेडुंलकरनेदेखील या सिनेमाचं खूप कौतुक केलं आहे.
'तेंडल्या' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सचिन जाधव आणि नचिकेत वायकरने सांभाळली आहे. 'अश्वमेध मोशन पिक्चर्स'च्या बॅनरअंतर्गत या सिनेमाची निर्मिती होत आहे. 'तेंडल्या' हा सिनेमा आधी 24 एप्रिल 2020 रोजी सचिनच्या वाढदिवशी प्रदर्शित होणार होता. पण कोरोनामुळे या सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली. पण आता या सिनेमाची रिलीज डेट समोर आल्याने सिनेप्रेमींसह क्रिकेटप्रेमीदेखील या सिनेमासाठी उत्सुक आहेत.
नवोदित कलाकारांना 'तेंडल्या'ने दिली संधी
'तेंडल्या' या सिनेमात अनेक नवोदित कलाकार आहेत. या सिनेमात 'पोप्या'च्या भूमिकेत ओंकार गायकवाड, 'इंजान'च्या भूमिकेत स्वप्नील पाडळकर, 'बारका आज्या'च्या भूमिकेत राज कोळी, हर्षद केसरेला 'जॉनट्यां', महेश जाधव 'जयसूर्या'च्या आणि आकाश तिकोटीला डीपीच्या भूमिकेत दिसणार आहे.
गेल्या सहा वर्षांपूर्वी इस्लामपूर जवळील एका खेड्यातील तरुण मंडळींनी एकत्र येत उपलब्ध साधनांच्या आधारे 'तेंडल्या' या सिनेमाची निर्मिती केली आहे. आर्थिक अडचणींमुळे या सिनेमाचं प्रमोशन न करता आल्याने हा सिनेमा प्रदर्शनापासून रखडला होता.
संबंधित बातम्या