Scam 2003 The Telgi Story: 2003 मध्ये मुंबईसह संपूर्ण देशाला ढवळून काढणा-या तेलगी स्टॅम्प पेपर घोटाळ्यावर प्रदर्शित होणा-या वेब सीरिजच्या निर्मात्यांविरुद्ध मुंबई सत्र न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी अब्दुल करीम तेलगीची मुलगी सना इरफान तालिकोटी यांनी याचिका दाखल करत या वेब सीरिजच्या प्रदर्शनावर स्थगितीची मागणी केली आहे. त्यामुळे 'स्कॅम 2003: द तेगली स्टोरी' (Scam 2003 The Telgi Story) ही वेब सीरिज आता रिलीज होण्याआधीच वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता आहे.
कुटुंबियांची भूमिका काय?
'स्कॅम 2003: द तेगली स्टोरी' या वेब सीरिज रिलीज होण्यापूर्वी तेलगी कुटुंबियांची पूर्व परवानगी घेण्यात आलेली नाही, असा आरोप करत तेलगी कुटुंबियांनी मुंबई शहर दिवाणी न्यायालयात अॅपलॉज एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक हंसल मेहता, सहव्यवस्थापक प्रसून गर्ग आणि सोनी लिव्ह ओटीटी यांच्याविरुद्ध ही याचिका दाखल केली आहे. आपले वकील माधव थोरात यांच्यामार्फत दाखल केलेल्या या दाव्यात सनानं आरोप केला आहे की, ही मालिका एका पुस्तकावर आधारित आहे ज्यात सत्य परिस्थिती लिहिलेली नाही. त्यामुळे ही वेब सीरिज कुटुंबाच्या वैयक्तिक आणि खासगी अधिकारांच उल्लंघन करतं आहे.
सना यांनी आरोप केला आहे की, कादंबरीत तेलगी यांची व्यक्तिरेखा खोटी, निराधार, अपमानास्पद, आक्षेपार्ह, अप्रिय आणि अत्यंत बदनामीकारक पद्धतीनं रंगवली आहे. यातनं संपूर्ण कुटुंबाची बदनामी होत असल्यानं त्यामुळे आपल्या प्रतिष्ठेचं कधीही भरून न येणारं नुकसान होणार आहे. याशिवाय वेब सीरिजमुळे कुटुंबातील अल्पवयीन मुलांचंही मोठ नुकसान होईल. सना यांच्यामते अब्दुल करीम तेलगींनी अनेक सामाजिक कारणांसाठी बराच वेळ आणि पैसा खर्च केला होता. पाण्याच्या टाक्या, बोअरवेल, मंदिर आणि मशिदी बांधण्यासाठी मोठी आर्थिक मदत केली आहे. याशिवाय त्यांनी अनेक गरीब मुलांच्या शिक्षणाचा खर्चही उचलला आहे.
काय आहे तेगली स्टँप पेपर घोटाळा?
स्टॅम्प पेपर घोटाळ्यात झालेली 30 वर्षांची शिक्षा भोगत असताना कारागृहातच 56 वर्षीय अब्दुल करीम तेलगीचा ऑक्टोबर 2017 मध्ये बंगळुरूच्या रुग्णालयात मृत्यू झाला. साल 1993 ते 2002 दरम्यान तेलगीनं नाशिकमधील सरकारी सुरक्षा मुद्रणालयातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधून बनावट स्टॅम्प पेपर छापले. त्यासाठी सरकारी लिलावात मशिनरी खरेदी केल्याचाही आरोप आहे. त्यानंतर तेलगीनं बँका, विमा कंपन्या आणि स्टॉक ब्रोकरेज फर्म्स यांसारख्या मोठ्या खरेदीदारांना सवलतीत हे बनावट स्टँप पेपर विकले होते.
या प्रकरणातील मुख्य आरोपी तेलगीला 22 नोव्हेंबर 2001 रोजी बंगळुरूमधून अटक करण्यात आली होती. तेलगीच्या अटकेनंतर हजारो कोटी रुपयांचा हा स्टँप घोटाळा उघड झाला. त्यानंतरच्या तपासात तेलगीचे अनेक राजकारणी आणि वरिष्ठ सराकरी तसेच पोलीस अधिकाऱ्यांशी असलेले घनिष्ठ संबंधही उघड झाले होते. विशेष म्हणजे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांचं नाव देखील तेलगीसोबत जोडलं गेलं होतं. महाराष्ट्रासह देशातील 11 राज्यांमध्ये तेलगीवर सुमारे 48 गुन्हे दाखल आहे. ज्यात पुण्यातील बंड गार्डन पोलीस ठाण्यातील गुन्ह्याचाही समावेश होता. पोलीसांनी याप्रकरणी सुमारे 500 कोटींचे बनावट स्टॅम्प पेपर जप्त केले होते. मात्र त्याआधी तेलगीनं शकडो कोटींच्या बनावट स्टँप पेपर बाजारात विकले होते. हा तपास पुढे सीबीआयकडे वर्ग करण्यात आला होता.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: