Tejaswini Pandit : मराठमोळी अभिनेत्री तेजस्विनी पंडितने (Tejaswini Pandit) अनेक मराठी मालिका, सिनेमे आणि वेबसीरिजमध्ये काम केलं आहे. तेजस्विनी प्रमाणे तिची आई म्हणजेच ज्योती चांदेकरदेखील मराठी मनोरंजनसृष्टीतील एक अभिनेत्री आहेत. आता ज्योती चांदेकर यांना मानाच्या ‘बालगंधर्व जीवनगौरव पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले आहे. तेजस्विनीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत यासंदर्भात माहिती दिली आहे.
तेजस्विनीने एक भावूक पोस्ट शेअर केली आहे. तिने लिहिलं आहे, "मानाच्या बालगंधर्व जीवनगौरव पुरस्काराने आईला गौरवण्यात आलं आहे. 50 वर्षांची कारकीर्द! अत्यंत कष्टाने साधलेला दीर्घ कला प्रवास...आईच्या व्यस्त कामामुळे तिचा सहवास आम्हाला मुली म्हणून खूप उशीरा मिळाला. आईच्या हातची चव आम्ही पहिल्यांदा वयाच्या 16 व्या वर्षी चाखली. अशा आईसोबत असण्याचे अनेक क्षण आम्हाला अनुभवता आले नाहीत. पण याची अजिबात तक्रार नाही...कारण आमची आई आमचं घर सांभाळण्याची जबाबदारी खांद्यावर घेऊन, अनेक बलिदान देऊन स्वत:चं अस्तित्व घडवत होती आणि आज तिला हा मानाचा पुरस्कार स्विकारताना बघून हा संघर्ष सार्थकी लागल्याचे आम्ही साक्षीदार झालो".
तेजस्विनीने पुढे लिहिले आहे,"बाबा असता तर हा पुरस्कार स्विकारताना आईला आनंद द्विगुणित झाला असता. कारण तिच्या या यशामध्ये त्याचा सुद्धा खूप मोठा वाटा आहे. कारण आई घरी नसताना बाप असून आईची भूमिका बाबाने लीलया पेलली आहे. आईचा अभिमान असल्याचंही तेजस्विनीने म्हटलं आहे.
ज्योती चांदेकरांनी केलेले सिनेमे
‘मी सिंधुताई सपकाळ’, ‘पाऊलवाट’, ‘सुखान्त’ यांसारख्या अनेक मराठी सिनेमांमध्ये ज्योती चांदेकर दिसून आल्या आहेत. त्यांनी मराठी नाटकांमध्येदेखील काम केलं आहे.
संबंधित बातम्या