Tejaswini Pandit : तेजस्विनी पंडित (Tejaswini Pandit) आज एक नावाजलेली अभिनेत्री आहे. आपल्या अभिनयाच्या जोरावर तिने मराठी मनोरंजनसृष्टीत स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. पण करिअरच्या सुरुवातीला पुण्यातील एका नगरसेवकाने तिला त्रास दिला होता. 


सिनेपत्रकार सौमित्र पोटे (Soumitra Pote) यांच्या 'मित्र म्हणे' (Mitra Mhane) या पॉडकास्टवरील मुलाखतीमध्ये तेजस्विनीने स्ट्रगलिंगच्या काळात तिला आलेल्या अनुभवांवर भाष्य केली. ती म्हणाली,"करिअरच्या सुरुवातीला 2009-2010 साली मी पुण्यात सिंहगड रोडवरील एका अपार्टमेंटमध्ये भाड्याने राहत होते. मी राहत असलेलं घर एका नगरसेवकाच्या मालिकीचं होतं. एकेदिवशी मी त्या नगरसेवकाच्या ऑफिसमध्ये भाडं देण्यासाठी गेले तेव्हा त्याने माझ्याकडे घाणेरडी मागणी केली". 


तेजस्विनी पुढे म्हणाली,"त्यावेळी त्याच्या टेबलावर असलेला पाण्याचा ग्लास मी उचलला आणि त्याच्या चेहऱ्यावर फेकला. तसेच अशा मार्गाचा अवलंब केला असता तर भाड्याच्या घरात राहिले नसते, करिअरच्या सुरुवातीलाच माझं घरं असतं आणि दारात गाड्या असत्या, असं नगरसेवकाला सुनावलं". 






तेजस्विनीने 2004 साली केदार शिंदेंच्या 'अगं बाई अरेच्चा' या सिनेमाच्या माध्यमातून सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं. त्यानंतर तिने 'मी सिंधुताई सपकाळ','तू ही रे', 'देवा', 'एक तारा' अशा गाजलेल्या सिनेमांत काम केलं. 'एकाच या जन्मी जनू', 'लज्जा' या मालिकांमध्येदेखील तिने काम केलं आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी तेजस्विनीची 'रानबाजार' ही सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. लवकरच ती 'अथांग' या वेबसीरिजमध्ये झळकणार आहे. तिची 'बांबू' या सिनेमाची ती निर्मिती करणार आहे. तेजस्विनीच्या आगामी प्रोजेक्टची चाहत्यांना उत्सुकता आहे. 


संबंधित बातम्या


Duniyadari: 'दुनियादारीमधील शिरीनचा रोल माझा होता, पण...'; या अभिनेत्रीनं केला गौप्यस्फोट