मुंबई : सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणांमध्ये पोलिसांचा तपास दिवसेंदिवस अधिक सखोल होत चालला आहे. बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक म्हणून ओळखले जाणारे संजय लीला भन्साळी यांची सोमवारी (6 जुलै) वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये चौकशी करण्यात आली. संजय लीला भन्साळी सकाळी 11.30 च्या सुमारास वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये आपल्या बॉडीगार्ड आणि लीगल टीमसोबत आले आणि दुपारी 3.30 च्या सुमारास ते वांद्रे पोलीस स्टेशनमधून निघाले. तीन तास चौकशी केल्यानंतर त्यांचा जबाब नोंदवण्यात आला. यानंतर वांद्रे संजय लीला भन्साळी सांताक्रूझ पोलीस स्टेशनमध्येही गेले होते. इथे डीसीपी अभिषेक त्रिमुखे आणि त्यांच्या टीमने भन्साळी यांची स्वतंत्र एक तास चौकशी केली.
सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणाच्या तपासादरम्यान सजंय लीला भन्साळी यांना एकूण 30 ते 35 प्रश्न विचारण्यात आले.
Dil Bechara Trailer | सुशांत सिंह राजपूतच्या 'दिल बेचारा'चा ट्रेलर प्रदर्शित
संजय लीला भन्साळी यांचा जबाब
रामलीला आणि बाजीराव मस्तानी चित्रपटातून काढल्यानंतर सुशांत सिंह राजपूत नैराश्यात गेला होता. याबाबत सुशांतसोबत काय चर्चा झाली होती?
यावर संजय लीला भन्साली म्हणाले की, "मी सुशांतला कोणत्याही चित्रपटातून काढलं नव्हतं किंवा रिप्लेस केलं नव्हतं. 2012 मध्ये सरस्वती चंद्र नावाच्या एका मालिकेच्या कास्टिंगदरम्यान माझी सुशांतसोबत भेट झाली होती. पण त्यावेळी सुशांतची या मालिकेसाठी निवड झाली नाही. पण मला त्याचा अभिनय आवडत होता.
त्यानंतर 2013 मध्ये आलेल्या रामलीला आणि 2015 मध्ये बाजीराव मस्तानीसाठी मी दोन वेळा सुशांत सिंह राजपूतला विचारणा केली होती. त्यावेळी तो यशराज फिल्म्स बॅनर अंतर्गंत बनत असलेल्या 'पानी' चित्रपटाच्या वर्कशॉप आणि शेड्यूलमध्ये व्यस्त होता. एक दिग्दर्शक म्हणून मला त्याचं संपूर्ण लक्ष आणि समर्पण हवं होतं. परंतु त्याच्याच व्यस्त शेड्यूलमुळे सुशांतने स्वत:च या दोन्ही चित्रपटांसाठी मला नकार दिला. यानंतर मी सुशांतला पुन्हा चित्रपटांबाबत कोणतीही बातचीत केली नाही."
"इतर अभिनेत्यांना/कलाकारांना ओळखतो त्याप्रमाणेच मी सुशांतला ओळखत होता. तो माझ्याशी वैयक्तिक गोष्टी शेअर करेल एवढं आमचं नातं जवळकीचं नव्हतं. त्याच्या नैराश्येबाबत मला काही कल्पना नव्हती. 2016 नंतर मी सुशांत सिंह राजपूतला फक्त तीन वेळा फिल्म शोमध्ये भेटलो होतो, पण यावेळी माझी त्याच्यासोबत चित्रपटात काम करण्याबाबत किंवा इतर कोणत्याही गोष्टीबाबत चर्चा झाली नाही," असं संजय लीला भन्साळी यांनी सांगितलं.
सुशांतची राहत्या घरी आत्महत्या
सुशांत सिंह राजपूतने 14 जून रोजी मुंबईच्या वांद्र्यातील राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली होती. त्यानंतर त्याच्या आत्महत्येबाबत अनेक तर्क लावले जात आहेत. तसंच या प्रकरणात आतापर्यंत अनेकांची चौकशी केली आहे. सोबतच त्याच्या मृत्यूनंतर बॉलिवूडमधील नेपोटिझमवर अनेक कलाकारांनी आपली भूमिका मांडली आहे.
संबंधित बातम्या