नवी दिल्ली : चाहत्याला चपराक लगावल्याप्रकरणी अभिनेता गोविंदाला दिलासा मिळाला आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार गोविंदा 9 वर्षांनी चाहत्याची बिनशर्त माफी मागण्यास तयार झाला आहे. त्यामुळे कोर्टाने केस बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
16 जानेवारी 2008 रोजी गोविंदाने संतोष रायला चपराक लागवली होती. घटनेच्या तब्बल नऊ वर्षांनंतर गोविंदाने सुप्रीम कोर्टात बिनशर्त माफीनामा सादर केला आहे. त्याचप्रमाणे संतोषला 5 लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याची तयारीही त्याने दर्शवली आहे. सुप्रीम कोर्टाने त्याला मंजुरी दिली असून केस बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
मागील सुनावणीत सुप्रीम कोर्टाने दोन्ही पक्षांना दोन आठवड्यांत समेट घडवण्याचा सल्ला दिला होता. 'तू हिरो आहेस, तू कोणाला कानशिलात कशी लगावू शकतोस?' असं कोर्टाने गोविंदाला विचारलं होतं.
'तुझे चित्रपट आम्ही एन्जॉय करतो. मात्र तू कोणाला मारावंस, हे आम्ही सहन करु शकत नाही. रील लाईफ आणि रियल लाईफ यातला भेद तू समजून घ्यायला हवास. मोठा हिरो आहेस, मन पण मोठं कर. सामान्य माणसाला चपराक लगावणं तुला शोभत नाही.' असं कोर्ट म्हणालं.