मुंबई : पॉर्न इंडस्ट्रीतून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या सनी लिऑनीने जगातील प्रभावशाली महिलांच्या यादीत स्थान मिळवलं आहे. बीबीसीने प्रसिद्ध केलेल्या 2016 मधील प्रभावशाली महिलांच्या यादीत सनीचा समावेश झाला आहे.

बीबीसी मागील चार वर्षांपासून ही यादी जाहीर करत आहे. बीबीसीने यंदाही क्रीडा, फॅशन, कलाकार, उद्योजक, अभियंता इत्यादी क्षेत्रात आपल्या कामगिरीने ठसा उमटवणाऱ्या 100 प्रभावशाली महिलांची यादी जाहीर केली आहे.

सनी लिऑनी मागील पाच वर्षांपासून बॉलिवूडमध्ये आहे. बिग बॉसद्वारे तिने एन्टरटेन्मेंट इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केलं होतं. पॉर्न स्टार ही इमेज पुसून अभिनेत्री म्हणून बॉलिवूडमध्ये ओळख बनवण्याची तिची इच्छा आहे. तिने आतापर्यंत जिस्म 2, जॅकपॉट, एक पहेली लीला, वन नाईट स्टॅण्ड या चित्रपटात काम केलं आहे.

बीबीसीच्या या यादीत महाराष्ट्र आणि चेन्नईमधील महिलांचाही समावेश आहे. कम्प्युटर इंजिनीअरिंगमध्ये ठसा उमटवणारी सांगलीची 20 वर्षी गौरी चिंदरकर, मुंबईतील अभिनेत्री आणि लेखिका नेहा सिंह, ट्रॅक्टर क्वीन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चेन्नईतील श्रीनिवासन ट्रॅक्टर कंपनीच्या सीईओ मल्लिका श्रीनिवासन, 105 वर्षीय कर्नाटकच्या पर्यावरणवादी सालुमराडा थिमाक्का यांनाही बीबीसीच्या यादीत स्थान मिळालं आहे.

याशिवाय गायिका आणि गीतकार एलिसिया कीस, अमेरिकेची सुवर्णपदक विजेती जिम्नॅस्ट सिमोल बेलिस आणि फ्रान्सच्या राजकीय नेत्या रचिदा डेटी यांचाही बीबीसीच्या यादीत समावेश आहे.