Sunny Deol Border 2 Movie :   'गदर 2' च्या (Gadar 2) माध्यमातून अभिनेता सनी देओलचे (Sunny Deol) रुपेरी पडद्यावर जोरदार कमबॅक झाले. बॉक्स ऑफिसवर धमाल उडवल्यानंतर आता सनी देओल 'बॉर्डर' 2'  (Border 2) मध्ये पुन्हा झळकणार आहे. सनी देओलने 'बॉर्डर' मध्ये मेजर कुलदीप चांदपुरी ही भूमिका साकारली होती. मल्टिस्टारर असलेल्या 'बॉर्डर' चित्रपटाची क्रेझ आजही कायम आहे. नुकतीच 'बॉर्डर 2'  या चित्रपटाची घोषणा करण्यात आली. या चित्रपटातही सनी देओल मेजर चांदपुरीची भूमिका साकारणार असल्याची चर्चा आहे. 'बॉर्डर' चित्रपटात सनी देओलवर चित्रीत झालेले एक दृष्य ऐनवेळी चित्रपटातून कापण्यात आले. या दृष्याबाबत सनी देओलने एका मुलाखतीत सांगितले. 


सनी देओलने युट्युबर रणवीर अल्लाबादिया याला दिलेल्या एका मुलाखतीची एक व्हिडीओ क्लिप व्हायरल होत आहे. या व्हिडीओ क्लिपमध्ये सनी देओल हा चित्रपटातील आपल्या आवडीच्या सीनबद्दल सांगत आहे.  सनी देओलने त्याआधी सांगितले की, धर्मेंद्र यांचा 'हकीकत' चित्रपट पाहिल्यानंतर मलादेखील एक युद्धपट करायचा होता. एकेदिवशी जे.पी. दत्ता यांनी लोंगेवाला युद्धाबाबत सांगितले. त्यावेळी मी कथा ऐकून तात्काळ होकार दिला. 


त्यावेळी खूप रडलो


सनी देओलने सांगितले की,  बॉर्डर चित्रपटात माझा एक सीन होता. तो चित्रपटात ठेवण्यात आला नाही. ज्यावेळी यु्द्ध संपत तेव्हा मी त्या ठिकाणी बॉर्डरजवळ असलेल्या मंदिरात जातो. त्या मंदिरात युद्धात प्राणाचे बलिदान दिलेले जवान बसलेले असतात. मी त्यांच्यासोबत संवाद साधत असतो. एकाला सांगतो की तू चिंता करू नकोस, तुझ्या घरी छप्पर दुरुस्ती करायची आहे ती करतो. कोणाला सांगतो की तुझ्या आईला नक्की भेटणार आहे. पुढे असे म्हणतो की, तुम्ही अशा ठिकाणी, स्वर्गात आहात, ज्या ठिकाणी द्वेष नाही, युद्ध नाही. हा सीन वाचत असताना मी खूप रडलो होतो असेही सनी देओलने सांगितले. मात्र, कदाचित चित्रपटाच्या लांबीमुळे हा सीन कापला असावा असेही सनी देओलने म्हटले. 


'बॉर्डर'ने केली होती तुफान कमाई... 


'बॉर्डर'मध्ये सनी देओलशिवाय अक्षय खन्ना, सुनील शेट्टी, सुदेश बेरी, जॅकी श्रॉफ, पूजा भट्ट, राखी गुलजार, पुनित इस्सार, कुलभूषण खरबंदा आणि शरबानी मुखर्जी यांच्यासह अनेक स्टार्स होते. 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धातील लोंगेवाला जवळ झालेल्या युद्धात भारतीय जवानांनी दाखवलेल्या अतुलनीय शौर्याबाबत हा चित्रपट आधारित होता. 'बॉर्डर' हा 1997 मध्ये सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट होता. त्याला 4 फिल्मफेअर आणि 3 राष्ट्रीय पुरस्कार मिळाले. 10 कोटींच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने जवळपास 39 कोटींची कमाई केली होती. या चित्रपटातील गाणी आजही लोकप्रिय आहेत.