Sunil Dutt Birth Anniversary : बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते सुनील दत्त (Sunil Dutt) यांनी एक कलाकार म्हणून बॉलिवूड जगतात आपली अमिट छाप सोडली. यांचा जन्म 6 जून 1929 रोजी पंजाबमध्ये झाला होता. अभिनयासोबतच त्यांनी चित्रपट निर्मिती आणि दिग्दर्शनातही हात आजमावला आणि सर्वच क्षेत्रात ते यशस्वी झाले. अभिनयच नव्हे, तर सुनील दत्त राज्यसभेचे खासदारही राहिले आहेत. ते मनमोहन सिंह सरकारमध्ये युवा आणि क्रीडा खात्याचे मंत्री होते. दोन वेळा खासदार बनले होते. त्यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया त्यांच्याबद्दलच्या काही खास गोष्टी..


अभिनेते सुनील दत्त यांचा जन्म पंजाब राज्यातील झेलम जिल्ह्यातील खर्डी नावाच्या गावात झाला होता. त्यांचे खरे नाव बलराज दत्त होते. सुनील दत्त यांचे बालपण खूप संघर्षमय होते. सुनील दत्त अवघ्या 5 वर्षांचे असताना त्यांचे वडील दिवाण रघुनाथ दत्त यांचे निधन झाले. वडील गेल्यानंतर आई कुलवंती देवी यांनीच त्यांना लहानाचे मोठे केले. यानंतर सुनील दत्त उच्च शिक्षणासाठी मुंबईत आले. त्यांनी जय हिंद महाविद्यालयात प्रवेश घेतला. पण, आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने, त्यांनी मुंबई बेस्ट बसमध्ये कंडक्टरची नोकरी स्वीकारली.


रेडिओ निवेदक म्हणून केले काम!


सुनील दत्त यांनी आपल्या मनोरंजन क्षेत्रातील करिअरची सुरुवात रेडिओपासून केली होती. ते रेडिओ ‘सिलोन’मधील सर्वात प्रसिद्ध हिंदी निवेदक होते. पण, त्यांना नेहमीच अभिनेता व्हायचं होतं. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी हिंदी चित्रपटात काम करण्याचा निर्णय घेतला. सुनील दत्त यांनी 1955मध्ये 'रेल्वे प्लॅटफॉर्म' या चित्रपटातून आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली. ‘मदर इंडिया’ या चित्रपटात सुनील यांनी महत्त्वाची भूमिका साकारली होती. या चित्रपटाने त्यांना स्टार बनवले. त्यांना 1964मध्ये 'मुझे जीने दो' या डाकूंच्या जीवनावरील चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. सुनील दत्त राजकारणातही सक्रिय होते. मनमोहन सिंह सरकारच्या कार्यकाळात ते युवा आणि क्रीडा खात्याचे मंत्री होते.


‘अशी’ सुरु झाली होती प्रेमकहाणी


नर्गिस दत्त आणि सुनील दत्त यांची प्रेमकहाणी ‘मदर इंडिया’ या चित्रपटाच्या सेटवर सुरू झाली होती. ‘मदर इंडिया’च्या सेटवर आग लागल्याने नर्गिसला वाचवताना सुनील दत्त गंभीर जखमी झाले होते. तिथून दोघांच्या प्रेमाला सुरुवात झाली. सुनील दत्त जेव्हाही बाहेर जायचे, तेव्हा ते नर्गिससाठी साड्या आणायचे. पण, नर्गिस यांनी त्या साड्या कधीच नेसल्या नाहीत. त्या साड्या आपल्याला शोभत नसल्याचं त्यांना वाटायचं. नर्गिस जेव्हा शेवटच्या क्षणी कॅन्सरशी लढत होत्या, तेव्हा सुनील दत्त पूर्णवेळ त्यांच्यासोबत होते.


सुनील दत्त शेवट ‘मुन्ना भाई एमबीबीएस’ या चित्रपटात दिसले होते. हा चित्रपट 2003साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात त्यांचा मुलगा संजय दत्त मुख्य भूमिकेत होता. या चित्रपटात सुनील यांनी संजयच्या वडिलांची भूमिका साकारली होती. 2005मध्ये हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले.


हेही वाचा :