मुंबई : भारताचा यष्टिरक्षक-फलंदाज रिषभ पंतला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या वनडे सामन्यानंतर टीकेची झोड सहन करावी लागली होती. रिषभच्या खराब यष्टिरक्षणामुळे टीम इंडियाला सामना गमवावा लागल्याचा आरोप नेटिझन्सनी केला. त्यानंतर प्रसिद्ध अभिनेता सुनील शेट्टीने त्याची पाठराखण केली आहे.

'तो अवघा 21 वर्षांचा आहे. क्रिकेटच्या तिन्ही फॉर्मेटमध्ये तो भारताचं प्रतिनिधित्व करतो. या वयात तुम्ही काय करत होतात? याचं आत्मपरीक्षण करा' असा सल्ला सुनील शेट्टीने ट्विटरवरुन दिला आहे. मोहाली वनडे सामन्याच्या वेळी उपस्थित प्रेक्षकांनी रिषभ पंतची हुर्यो उडवली होती.


टीम इंडियाचा 35 धावांनी पराभव करुन ऑस्ट्रेलियाने मालिका 3-2 ने जिंकली. मात्र त्याआधी झालेल्या चौथ्या सामन्यात ढिसाळ क्षेत्ररक्षणाचा फटका टीम इंडियाला बसला. चौथा सामना खिशात घालून 1-3 ने विजयी आघाडी घेण्याची संधी खरं तर भारताकडे होती. मात्र चार विकेट्सनी विजय मिळवत ऑस्ट्रेलियाने 2-2 ने बरोबरी केली होती. खराब आणि सुस्त क्षेत्ररक्षणामुळे सामना गमावल्याची कबुली कोहलीनेही दिली होती.

चौथ्या सामन्यात टीम इंडियाने अनेक झेल सोडल्यामुळे त्यांच्यावर पराभवाची नामुष्की ओढावली होती. 44 व्या षटकात युजवेंद्र चहल गोलंदाजी करत होता. त्यावेळी पंतने अॅश्टन टर्नरचा झेल सोडला. याच टर्नरने ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला.

पंतने त्यानंतर धोनीची प्रसिद्ध ट्रिक वापरण्याचा प्रयत्न केला, मात्र तो स्टम्प्स हिट करु शकला नाही. टर्नरला बाद करण्याची दुसरी संधी गमवल्यामुळे चहलसोबतच कोहलीही नाराज झाला.