मुंबई : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) याला महादेव गेमिंग अॅप प्रकरणात ईडीने (ED) समन्स बजवल्यानंतर आता आणखी दोन अभिनेत्यांना ईडीकडून समन्स बजावण्यात आलं आहे. कॉमेडीयन कपिल शर्मा (Kapil Sharma) आणि अभिनेत्री हुमा कुरेशीला (Huma Kureshi) ईडीकडून समन्स जारी करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच अभिनेत्री श्रद्धा कपूर हिला देखील ईडीकडून समन्स बजावण्यात आलं आहे. महादेव अॅप प्रकरणी ईडीकडून अभिनेता रणबीर कपूरला समन्स बजावलं होतं त्यानंतर या यादीमध्ये अभिनेत्री हिना खान (Hina Khan) हिचं देखील नाव असल्याची माहिती आता समोर येत आहे.
दरम्यान अभिनेता रणबीर कपूरची शुक्रवारी ईडीकडून चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. पंरतु त्यासाठी रणबीर कपूरकडून दोन आठवड्यांचा वेळ मागण्यात आला होता. त्याच पाठोपाठ आता या यादीमध्ये आणथी तीन अभिनेत्यांची नाव जोडली गेल्याची माहिती सूत्रांनी दिलीये. महादेव बुक अॅप प्रकरणी ईडीकडून सध्या चौकशी करण्यात येत आहे. यामध्ये अनेक अभिनेते आणि अभिनेत्रींची नावं सध्या पुढे येत आहेत. या अभिनेत्यांनी आणि अभिनेत्रींनी महादेव बुक अॅपसाठी जाहिरात केली असल्याचा दावा ईडीकडून करण्यात येत आहे.
नेमकं प्रकरण काय?
महादेव अॅप हे पोकर, कार्ड गेम्स, चान्स गेम्स, क्रिकेट, बॅडमिंटन, टेनिस आणि फुटबॉल अशा विविध लाइव्ह गेम्समध्ये बेकायदेशीर सट्टेबाजीसाठी ऑनलाइन प्लॅटफॉर्म आहे. याच अॅपची जाहिरात या बॉलीवूड अभिनेत्यांनी आणि अभिनेत्रींनी केला असल्याचा दावा ईडीकडून करण्यात येत आहे. दरम्यान या ऑनलाइन बेटिंग अॅप प्रकरणातील आरोपी सौरभ चंद्राकरच्या लग्नाला देखील अनेकांनी हजेरी लावली होती. तर त्याच्या वाढदिवासाच्या कार्यक्रमाला देखील अनेक अभिनेते उपस्थित होते. तर त्या कार्यक्रमांमध्ये त्यांनी विविध परफॉर्म्सन्स देखील केले असल्याचा दावा ईडीकडून केला जातोय.
रणबीरने मागितला दोन आठवड्यांचा वेळ
अभिनेता रणबीर कपूर याची देखील याच प्रकरणात शुक्रवारी चौकशी करण्यात येणार होती. अभिनेता रणबीर कपूर याने महादेव बुक अॅपची जाहिरात केली असून, त्याचे रोख रक्कम देखील घेतली असल्याचा ईडीचा दावा आहे. पण याच प्रकरणात रणबीर कपूर याने ईडीकडून दोन आठवड्यांचा वेळ मागितला आहे.