पाकिस्तानमध्येही 'सुलतान'चा धुमाकूळ, सर्व रेकॉर्ड मोडित
एबीपी माझा वेब टीम | 10 Jul 2016 02:01 PM (IST)
कराचीः भारतात अवघ्या तीन दिवसात दीडशे कोटींच्या जवळ पोहचलेला सलमान खानचा सुलतान सिनेमा पाकिस्तानमध्येही सुपरहिट ठरला आहे. ईदच्या मुहूर्तावर रिलीज झालेल्या सुलतानने पाकिस्तानात आतापर्यंत 15 कोटींची कमाई केली आहे. 'सुलतान'ने पाकिस्तानात पहिल्या तीन दिवसात 11 कोटी 60 लाखांचा व्यवसाय केला. चौथ्या दिवशीही 'सुलतान'ची घोडदौड कायम राहिली. सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 15 कोटींचा व्यवसाय केला आहे. एवढी जबरदस्त ओपनिंग मिळवणारा हा पहिलाच सिनेमा आहे. सर्व रेकॉर्ड मोडीत पाकिस्तानमध्ये सर्वात जास्त ओपनिंग मिळवण्याचा विक्रम यापूर्वी 'जवानी फिर नहीं आनीं' या सिनेमाच्या नावावर होता. या सिनेमाने 7 कोटी 50 लाख रुपयांची ओपनिंग मिळवली होती. मात्र 'सुलतान'ने केवळ दोनच दिवसात हा रेकॉर्ड मोडीत काढला आहे. 'सुलतान'ने भारतात जवळपास सर्वच सिनेमांचे रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. 'सुलतान'ने भारतात आतापर्यंत 142 कोटींची कमाई केली आहे. वर्ल्डवाईड 'सुलतान'ची कमाई ही 300 कोटींच्याही पुढे असल्याचं सांगण्यात येत आहे.