वरुण-अनुष्काच्या 'सुई धागा - मेड इन इंडिया'चा ट्रेलर लाँच
एबीपी माझा वेब टीम | 13 Aug 2018 01:45 PM (IST)
'सुई धागा - मेड इन इंडिया'चा ट्रेलर लाँच झाला असून 28 सप्टेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
मुंबई : अभिनेता वरुण धवन आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांची मुख्य भूमिका असलेल्या 'सुई धागा - मेड इन इंडिया' या चित्रपटाचा ट्रेलर लाँच झाला आहे. स्वावलंबी व्यवसायातून प्रेम आणि आदर मिळवणाऱ्या जोडप्याची ही कथा आहे. वरुण धवन मध्य प्रदेशातील 'मौजी' या टेलरच्या भूमिकेत आहे, तर अनुष्का त्याची पत्नी ममताची व्यक्तिरेखा साकारत आहे. ममता ही कुशल एम्ब्रॉयडरी कारागीर आहे. दोघांनाही नॉन-ग्लॅमरस भूमिका साकारायची संधी मिळाली आहे. सुरुवातीला, मौजी हा शिवणकामाचं यंत्र विकणाऱ्या एका दुकानात विक्रेता असल्याचं ट्रेलरमध्ये दिसतं. दुसरीकडे काम मिळत नसल्याने तो मालकाचा जाच सहन करत आहे. आपल्या पतीला होणारा त्रास ममताला बघवत नाही आणि ती त्याला स्वतःचा उद्योग सुरु करण्यासाठी पाठबळ देते, असं सिनेमाचं कथानक आहे. कुटुंबासोबत उडणारे खटके, डोळ्यातली मोठी स्वप्नं, एकांत मिळताना येणाऱ्या अडचणी असे काही प्रसंग 'सुई धागा'च्या ट्रेलरमध्ये दिसतात. 'दम लगा के हैशा' फेम शरत कटारियांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलं असून मनिष शर्मांची निर्मिती आहे. यशराज फिल्म्सने हा चित्रपट प्रस्तुत केला आहे. 28 सप्टेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.