Sonali Phogat Murder Case : भाजप नेत्या आणि टिकटॉक स्टार सोनाली फोगाट (Sonali Phogat) हत्या प्रकरणात आता अनेक खुलासे होत आहेत. आता ‘त्या’ घटनेदिवशी सोनाली फोगाट यांच्यासोबत नेमकं काय घडलं? हे सांगणारी गोवा पोलिसांची केस डायरी एबीपीच्या हाती लागली आहे. त्या दिवशी काय घडले, हे या डायरीत सांगितले गेले आहे. या डायरीतील तक्रारदार हे अंजुना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रशाल नाईक असून, त्यांनी सांगितलेय की, 23 ऑगस्ट रोजी सकाळी 9:22 वाजता सेंट अँथनी हॉस्पिटलमधून त्यांना वैद्यकीय अधिकाऱ्याचा फोन आला होता, त्यानंतर ते हॉस्पिटलमध्ये गेले होते.


चौकशीदरम्यान, हॉस्पिटलने सांगितले की, सोनाली यांना हॉस्पिटलमध्ये आणण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. तर, सुधीर (Sonali Phogat PA Sudhir Sangwan) आणि सुखविंदर यांची चौकशी केली असता, त्यांनी आपल्या जबाबात सांगितले की, जेव्हा ते कर्लीज रेस्टॉरंटमध्ये होते, तेव्हा सोनाली यांनी सुधीरला आपली तब्येत बरी नसल्याचे सांगितले. त्यानंतर 2:30च्या सुमारास सोनाली यांना लेडीज टॉयलेटमध्ये नेण्यात आले, जिथे त्यांना उलटी झाली. मात्र, यानंतर त्या परत आल्या आणि नाचू लागल्या.


ग्रँड लिओनी रिसॉर्टमध्ये बिघडली सोनाली यांची तब्येत


यानंतर सोनाली यांच्या सांगण्यावरून पहाटे साडेचार वाजता सुधीरने सोनाली (Sonali Phogat) यांना पुन्हा बाथरूममध्ये नेले. मात्र, सोनाली फोगाट काही वेळ टॉयलेट सीटवरच झोपल्या. सकाळी 6च्या सुमारास सुधीर आणि सुखविंदरने 2 लोकांच्या मदतीने सोनाली यांना कर्लीज रेस्टॉरंटच्या पार्किंगमध्ये नेले, तेथून ते एका टॅक्सीने ग्रँड लिओनी रिसॉर्टमध्ये गेले. येथे पोहोचल्यानंतर सोनाली यांची तब्येत आणखी बिघडू लागली. त्यानंतर सोनाली यांना सेंट अँथनी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले.


सुधीरने दिली कट रचल्याची कबुली


तर, कबुलीजबाबात सुधीरने सांगितले की, तो सोनाली यांना पार्टीच्या बहाण्याने कर्लीज हॉटेलमध्ये घेऊन गेला, जिथे त्याने सोनाली यांना जबरदस्तीने पाण्यात अंमली पदार्थ मिसळून प्यायला लावले. सुखविंदरने त्याला ड्रग्ज घेण्यात मदत केल्याचेही सुधीरने आपल्या कबुलीजबाबात सांगितले. त्यानंतर सुखविंदरनेही ही गोष्ट कबुल केली. गोव्यात शूटिंगचा कोणताही प्लॅन नव्हता, त्यांना गोव्यात आणण्याचा हा कट होता, असे त्याने पोलिसांनी सांगितले आहे. तसेच, सोनालीच्या हत्येचा कट फार पूर्वीपासून रचला गेला होता, याची कबुली देखील त्याने दिली आहे.


कबुलीजबाबात सुधीरने पुढे सांगितले की, त्याने सोनाली (Sonali Phogat) आणि सुखविंदरला दिलेल्या पाण्याच्या बाटलीत ड्रग्ज मिसळले होते, ते पाणी तो स्वतः देखील प्यायला होता. त्यानंतर सुधीर पोलिसांना कर्लीजमधील बाथरूममध्ये घेऊन गेला, जिथे त्याने ड्रग्ज लपवले होते. पोलिसांनी बाथरूमच्या फ्लशमध्ये लपवलेले ड्रग्ज जप्त केले आहे.


इतर महत्त्वाच्या बातम्या: