मुंबई : 'फोर्ब्स' या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या मासिकात 2016 ची जगभरातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या सेलिब्रेटींची यादी प्रसिद्ध झाली आहे. बॉलिवूडचे सुपरस्टार शाहरुख खान आणि अक्षयकुमार यांचा यादीत वरचा नंबर लागला आहे.

 
अमेरिकन गायिका टेलर स्विफ्टने 170 मिलियन डॉलर (अंदाजे 1141 कोटी) रुपयांची कमाई करत या यादीत अव्वल स्थान पटकावलं आहे. शाहरुख खानने 33 मिलियन डॉलर (अंदाजे 221 कोटी रुपये) कमवत 86 वं स्थान पटकावलं आहे. तर खिलाडीकुमार अक्षयने 31.5 मिलियन डॉलर (अंदाजे 211 कोटी रुपये) कमवून 94 वं स्थान मिळवलं आहे.

 
शाहरुख खानने बॉलिवूडच्या बॉक्स ऑफिसवर वर्चस्व कायम ठेवल्याचं फोर्ब्सने म्हटलं आहे. चित्रपट आणि जाहिरातीतून त्याने ही कमाई केल्याचाही यात उल्लेख आहे. वर्षभरात अक्षयकुमारची मात्र 76 व्या स्थानावरुन 94 व्या क्रमांकावर घसरण झाली आहे. अक्षय हा बॉलिवूडच्या सर्वाधिक व्यस्त ताऱ्यांपैकी एक असल्याचं फोर्ब्सने लिहिलं आहे.

 
यादीत फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो चौथ्या, बास्केटबॉलपटू लेब्रॉन जेम्स अकराव्या आणि गायिका मडोना बाराव्या स्थानावर आहे. ब्रॅड पिटही अक्षयसोबत 94 व्या स्थानावर असून गायिका ब्रिटनी स्पेअर्स 99 व्या क्रमांकावर आहे.

 
जून 2015-16 या कालावधीत जगभरातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या 100 सेलिब्रेटींनी एकूण 5.1 बिलियन डॉलर (अंदाजे 34 हजार 225 कोटी रुपये) कमावले आहेत.