मुंबई : बहुचर्चित बाहुबली चित्रपटात भूमिका करण्यासाठी हृतिक रोशन पासून बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांना विचारणा झाल्याचं ऐकायला मिळतं. अनेकांनी ही सुवर्णसंधी लाथाडल्याचा पश्चातापही आता व्यक्त केला आहे. अनेक जण बाहुबलीचे दिग्दर्शक राजमौली यांच्यावर स्तुतिसुमनं उधळत असताना श्रीदेवी मात्र काहीशी नाराज आहे.
शिवगामीची भूमिका दाक्षिणात्य अभिनेत्री राम्याकडे जाण्यापूर्वी प्रख्यात अभिनेत्री श्रीदेवीला ऑफर झाली होती. श्रीदेवीने ही भूमिका नाकारल्याचं म्हटलं जात असलं, तरी त्यामागील कारण गुलदस्त्यात होतं. मात्र दिग्दर्शक राजमौलीने त्याबाबत एका मुलाखतीत गौप्यस्फोट केला.
'शिवगामीच्या भूमिकेसाठी 8 कोटी रुपयांची मागणी केली होती. हैदराबादला शूटिंगच्या प्रत्येक शेड्यूल येण्या-जाण्यासाठी पाच-पाच बिझनेस क्लासची तिकीटं मागितली होती. त्याशिवाय शूटिंगच्या पूर्ण कालावधीसाठी तिला हैदराबादमधील सर्वात मोठ्या हॉटेलमध्ये पाच बिझनेस सुट्स हवे होते.' असं राजमौली यांनी सांगितलं. श्रीदेवीने बाहुबलीच्या हिंदी आवृत्तीत शेअर मागितल्याचा दावाही राजमौली यांनी केला आहे.
राजमौली यांनी केलेल्या खळबळजनक दाव्यामुळे चित्रपटसृष्टीसह सिनेचाहत्यांनाही मोठा धक्का बसला. श्रीदेवी अशी मागणी करेल, यावर विश्वास बसत नसल्याची प्रतिक्रियाही अनेकांनी दिली. श्रीदेवी मात्र या प्रकारामुळे खवळली आहे. राजमौलीसारख्या प्रतिष्ठित दिग्दर्शकाने अशाप्रकारे व्यावसायिकदृष्ट्या गुप्त बाबी उघड करणं चूक असल्याची प्रतिक्रिया श्रीदेवीने दिली आहे.
'कुठल्याच दिग्दर्शकाला कलाकाराने केलेल्या मागण्या, अटी किंवा मानधन सार्वजनिक करण्याचा अधिकार नाही. मी यापूर्वीही माझ्या अटी-शर्थींवर अनेक हिट चित्रपट नाकारले आहेत. मात्र आतापर्यंत कुठल्याच दिग्दर्शकाने याचा जाहीर गवगवा केलेला नाही. राजमौलींनी केलेल्या प्रकारामुळे मी दुखावली आहे' अशी भावना श्रीदेवीने व्यक्त केली.