मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवीच्या अकाली मृत्यूने संपूर्ण बॉलिवूड विश्वाला एक मोठा धक्का बसला. पण त्यांच्या मृत्यूने अनेक प्रश्न मात्र निर्माण झाले आहेत. श्रीदेवी यांचा मृत्यू हा बॉलिवूडमधल्या अघोरी स्पर्धेची बळी होता का? असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे.

श्रीदेवी जेव्हा बॉलिवूडमध्ये आली तेव्हा ट्रेन्ड साऊथ इंडियन होता. पण काळ बदलत गेला तसं श्रीदेवीलाही बदलावं लागलं. धष्टपुष्ट अभिनेत्रींची सद्दी संपली आणि सडपातळ बांध्याच्या हिरॉईन्सचा जमाना आला. अर्थातच या स्पर्धेत स्वतःला मेन्टेन करण्यासाठी श्रीदेवी यांना मेहनत घ्यावी लागली आणि त्याच मेहनतीनं त्यांचा जीव घेतला का? असा प्रश्न आता निर्माण झाला आहे

खरं तर आपल्या तब्येतीबाबत श्रीदेवी थोडी अतिकाळजी घ्यायची असं म्हंटलं तर वावगं ठरणार नाही. पण आपल्या आरोग्याबाबत इतकी सजग असलेली श्रीदेवी अशी अचानक का गेली?



श्रीदेवीच्या मृत्यूची पहिली शंका

श्रीदेवीच्या मृत्यूचा शोध घेताना फिल्मी दुनियेतली कुजबुज कानी पडली. काही न्यूज वेबसाईट्सच्या मते श्रीदेवी आपलं वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी काही औषधे घेत असे. याच औषधांचं अतिरिक्त सेवन हे हृदयासाठी घातक असतं आणि त्याच औषधांनी घात केल्याचा संशय आहे.



श्रीदेवीच्या मृत्यूची दुसरी शंका

या इंडस्ट्रीत स्वतःला मेन्टेन करायचं असेल, तर हिरॉईन्सना कायम टोन्ड शेपमध्ये आणि आकर्षक चेहऱ्यानंच वावरावं लागतं हे कटू सत्य आहे. त्याच मान्यतेपोटी श्रीदेवीनंही आपल्या चेहऱ्यात अनेक बदल करुन घेतल्याची चर्चा इंडस्ट्रीमध्ये आहे.

सूत्रांच्या मते, काही महिन्यांपूर्वी श्रीदेवीने आपल्या ओठांवर सर्जरी करुन घेतली होती. त्या सर्जरीमध्ये काही चुका झाल्या होत्या आणि त्याच दुरुस्त करण्यासाठी श्रीदेवी दुबईमध्ये थांबल्या होत्या असं बोललं जातं. त्यामुळे त्याच सर्जरीसाठी लागणाऱ्या औषधांनी त्यांचा जीव घेतला का?

अर्थात श्रीदेवीने प्लॅस्टिक सर्जरी केली होती, की नाही याची स्पष्ट माहिती नसल्याने यावर शिक्कामोर्तब करणं योग्य नाही.



श्रीदेवीच्या मृत्यूची तिसरी शंका

गेल्या काही दिवसांपासून श्रीदेवीने स्वतःला स्लिम-ट्रिम ठेवण्यासाठी क्रॅश डाएटिंग सुरु केल्याची चर्चा होती. तिचं खाणं प्रचंड रोडावल्याचंही बोललं जात होतं. त्यामुळे श्रीदेवीच्या मृत्यूमागे हे तर कारण नसावं?

श्रीदेवीच्या मृत्यूचं कारणं काहीही असलं, तरी श्रीदेवी या जुलमी स्पर्धेचा बळी होती, असं म्हंटलं तरी वावगं ठरणार नाही. या इंडस्ट्रीमध्ये सुडौल आणि मादक बांधा, सुंदर चेहरा आणि सुरकुत्या नसलेल्या चेहऱ्यांवरच स्पॉटलाईट पडतो. हिरॉईनचा चेहरा सुरकुतला की तिच्या नशिबालाही सुरकुत्या पडतात.

ललाटीचं नशीब पुसलं जाऊ नये म्हणून तर श्रीदेवी धावत नव्हती? आणि तिचं तेच धावणंच तिच्या जीवावर बेतलं नाही ना?

आरोग्यापेक्षा श्रीदेवीनं सौंदर्याला जास्त महत्त्व तर दिलं नाही ना? असे अनेक प्रश्न तिच्या चाहत्यांना पडले आहेत. कारण ती ‘सदमा’तल्या हिरॉईनसारखी निघून गेली आणि तिच्या दु:खात तिचे चाहते कमल हसनसारखे सैरभैर झाले आहेत.

संबंधित बातम्या :

नवा दावा - श्रीदेवींना बाथटबमध्ये बेशुद्ध अवस्थेत हॉटेल स्टाफने पाहिलं!


श्रीदेवी यांना हृदयासंबंधी कोणताही विकार नव्हता : संजय कपूर

'श्रीदेवी बाथटबमध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळल्या', खलीज टाइम्सचा दावा