नवी दिल्ली : बॉलिवूडची हवाहवाई श्रीदेवीचा नुकताच प्रदर्शित झालेला 'मॉम' सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. तीनच दिवसात या सिनेमाने 14.40 कोटीची कमाई केली आहे. पण सध्या या सिनेमाच्या निमित्त श्रीदेवीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, या व्हिडीओत ती ढसाढसा रडल्याचं पाहायला मिळत आहे.

श्रीदेवीच्या 'मॉम' सिनेमातील अभिनयाचं सर्वत्रच कौतुक होत आहे. याशिवाय सिनेमात तिच्या मुलीची भूमिका साकरणाऱ्या सेजल अली आणि अदनान सिद्दीकी यांच्या अभिनयाचं सर्वांनी कौतुक होत आहे. त्यामुळे सिनेमातील सेजल आणि अदनान सिद्दकीच्या अभिनयाचं कौतुक करणारा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यावेळी ती सेजलच्या आठवणींनी ढसाढसा रडली.


वास्तविक, 'मॉम' सिनेमाच्या शूटिंग दरम्यान श्रीदेवी आणि सेजल अलीचं कमालीचं बॉडिंग पाहायला मिळालं. शूटिंगच्या सेटवरही सेजल श्रीदेवीकडे खऱ्या मुलीप्रमाणे हट्ट करायची. त्याचमुळे श्रीदेवीचा व्हायरल होणाऱ्या व्हिडीओतूनही श्रीदेवी आणि सेजलमधील नाते संबंध दिसून येत आहेत. तिच्या आठवणींने श्रीदेवीला आपल्या भावना अनावर झाल्या.

सेजल अली ही एक पाकिस्तानी अभिनेत्री असून, तिनेच श्रीदेवीचा हा व्हिडीओ आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना तिने माझ्यासाठी हा आश्चर्याचा धक्का असल्याचं म्हटलं आहे. तसेच मी स्वत: ला थांबवू शकत नाही. माझ्याकडेही शब्द नाहीत, असंही तिने पुढं लिहिलं आहे.

दरम्यान, गेल्या वर्षी उरीमधील दहशतवादी हल्ल्यानंतर काही राजकीय पक्षांनी पाकिस्तानी कलाकारांना विरोध केला होता. त्यामुळे बॉलिवूडमध्ये पाकिस्तानी कलाकारांना बंदी घालण्यात आली. त्यामुळेच 'मॉम' सिनेमाच्या प्रदर्शनापूर्वी सिनेमाचं प्रमोशन करण्यासाठी सेजल आणि अदनान सिद्दीकी भारतात येऊ शकले नव्हते. त्यामुळे सिनेमाच्या प्रमोशनची जबाबदारी श्रीदेवीवरच होती.

उरी हल्ल्यापूर्वीच मॉम सिनेमाचं शूटिंग सुरु झाल्याने, सेजल आणि अदनान यांना घेऊनच सिनेमाचं शूटिंग पूर्ण करण्यात आलं.