Sridevi Birth Anniversary Google Doodle : बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी (Sridevi) यांची आज 60 वी जयंती आहे. त्यानिमित्ताने सर्च इंजिन गूगलने एक खास डूडल (Google Doodle) बनवलं आहे. या खास डूडलच्या माध्यमातून गूगलने श्रीदेवी यांना मानवंदना दिली आहे. या गूगल डूडलमध्ये श्रीदेवी खास नृत्याची पोझ देताना दिसत आहेत. 


'बॉलिवूडची पहिली लेडी सुपरस्टार' अशी श्रीदेवी यांची ओळख आहे. 13 ऑगस्ट 1963 रोजी तामिळनाडूमध्ये जन्मलेल्या श्रीदेवी यांनी जवळपास चार दशकं प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन केलं आहे. या प्रवासादरम्यान त्यांनी 300 पेक्षा अधिक सिनेमांत काम केलं आहे. आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने श्रीदेवी यांनी सर्वांनाच वेड लावलं.






वयाच्या चौथ्या वर्षी अभिनयक्षेत्रात पदार्पण


गूगलने खास डूडलच्या माध्यमातून श्रीदेवी यांचा सिनेप्रवास उलगडण्याचा प्रयत्न केला आहे. गूगल डूडल शेअर करत त्यांनी लिहिलं आहे,त्या बालपणीच सिनेमावर प्रेम करायला लागल्या आणि वयाच्या चौथ्या वर्षी 'कंधन करुनई' या तामिळ सिनेमात झळकल्या. एकंदरीतच श्रीदेवी यांनी मनोरंजनसृष्टीत पदार्पण केल्यानंतर बॉलिवूडसह अनेक दाक्षिणात्य सिनेमांतही काम केलं आहे.


श्रीदेवी यांचे गाजलेले चित्रपट... (Sridevi Famous Movies)


श्रीदेवी यांनी चार दशकांत अनेक गाजलेल्या सिनेमांत काम करत आपल्या अभिनयाची जादू दाखवली. सदमा, नगीना, चांदनी, लम्हे, जुदाई, इंग्लिश विंग्लिश, मॉम या सुपरहिट सिनेमांचा यात समावेश आहे. श्रीदेवी यांना त्यांच्या अभिनय आणि नृत्यासाठी अनेक नामांकित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. भारतीय सिनेसृष्टीतील यशस्वी अभिनेत्रींच्या यादीत श्रीदेवी यांचा समावेश आहे.


श्रीदेवी यांचं खरं नाव श्री अम्मा अयपन्न यंगर होतं. त्यांनी सिनेसृष्टीत आल्यानंतर आपलं नाव बदललं. श्रीदेवी यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक अभिनेत्यांसोबत काम केलं आणि अनिल कपूर आणि जितेंद्र यांच्यासोबतची त्यांची जोडी खूप गाजली. श्रीदेवीने केवळ आपल्या अभिनयानेच नव्हे, तर सौंदर्यानेही लोकांना घायाळ केले होते. आजही तिचे चित्रपट प्रेक्षक आवडीने आवर्जून बघतात. श्रीदेवीला बॉलिवूडची पहिली ‘लेडी सुपरस्टार’ म्हटलं जातं. 24 फेब्रुवारी 2018 या दिवशी श्रीदेवीच्या आकस्मिक निधनाने अवघ्या मनोरंजन विश्वालाच मोठा धक्का बसला होता.


बॉलिवूडच नव्हे तर, श्रीदेवीने साऊथ सिनेमांत काम करून खूप प्रसिद्धी मिळवली. दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील एक दिग्गज अभिनेत्री अशी श्रीदेवीची ओळख होती. ‘मंद्रू मुदिचू’, ‘सिगप्पू रोजकल’, ‘कल्याणरामन’, ‘जोनी’, ‘मीन्दुम कोकिला’ यांसारख्या चित्रपटांमध्ये दमदार अभिनया करत श्रीदेवीने दक्षिणात्य मनोरंजन विश्वात वेगळे स्थान मिळवले होते.