मुंबई: तुम्हाला आनंद चित्रपट आठवत असेल.. राजेश खन्ना आणि अमिताभचा आनंद.. तगड्या अभिनयाची जुगलबंदी.. दोघंही ऐऩ भरात असतानाचा आनंद.. अजरामर चित्रपट. त्यातला एक डायलॉग कालातीत आहे.  म्हणजे गावपाड्यावर राहणाऱ्या मुलांपासून ते एफसी रोडवर किंवा पेडर रोडवर फिरणाऱ्या तरुणांनाही तो नीट माहिती असतो.


‘बाबूमोशाय जिंदगी लंबी नहीं बडी होनी चाहीए’. इरफान आणि सोनालीनं तर अनेकांच्या आयुष्यात रंग भरले. तगड्या अभिनयानं आनंद दिला. पण इरफाननंतर आता सोनालीलाही कॅन्सरनं गाठलं आहे.

सिनेमातील कॅन्सरतज्ज्ञ सोनाली

‘कल हो ना हो’ चित्रपटात सोनाली कॅन्सर तज्ज्ञाच्या भूमिकेत होती. शाहरुखच्या आयुष्यात पॉझिटिव्हिटी भरणारी, सोनाली तिच्या सहज अभिनयानं छोट्या भूमिकेत असूनही लक्षात राहिली. पण आता त्याच सोनालीला पेशंट व्हावं लागलंय.

सोनालीनं आपल्याला हायग्रेड कॅन्सर झाल्याचं जाहीर करतानाच तिनं एक भावूक पत्रही लिहिलंय.

“कधीकधी तुम्हाला काही गोष्टींची कुणकुण लागते. आयुष्यात अचानक बदल होतो. नुकतंच मला हायग्रेड कर्करोग असल्याचं निदान झालंय. माझे मित्र आणि कुटुंबीय माझ्यासोबत आहेत. ते शक्य ती मदत करतायत. मी त्यांची आभारी आहे. तातडीनं उपचार घेण्याशिवाय पर्याय नाही. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी सध्या अमेरिकेत उपचार घेतेय”.

90 चं दशक गाजवलं

90 च्या दशकात सोनालीच्या प्रेमात पडला नाही, असा एकही तरुण नसेल. सरफरोश, दिलजले, लज्जा, हम साथ साथ है अशा चित्रपटातील सोज्वळ भूमिकांमुळे सोनाली तरुणाईंच्या मनात खास जागा होती.

बॉम्बेमधल्या हम्मा हम्मा गाण्यावरचा तिचा कातील डान्स कुठलाही रसिक विसरु शकणार नाही.पण सोनालीच्या लखलखीत आयुष्याला नजर लागली ती कॅन्सरची.

2016 च्या इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या आकडेवारीनुसार देशात 39 लाख जणांना कॅन्सरनं गाठलं होतं. ज्यात उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि बिहार सर्वात आघाडीवर आहे. यात जवळपास 8 लाख लोकांना आपला जीव गमवावा लागलाय. अलिकडे कॅन्सरच्या डिटेक्शनचं प्रमाण वाढलंय. मात्र स्वस्त उपचारांअभावी अजूनही ग्रामीण रुग्णांना जीव गमवावा लागतो.

इरफान खानला न्यूरोइंडोक्राईन

अभिनेता इरफान खानला न्यूरोइंडोक्राईन कॅन्सरनं गाठलं. अगदी बेसावध. बॉलिवूड आणि हॉलिवूडमध्ये एकापेक्षा एक सरस प्रयोग करण्यात इरफान गुंतला होता. त्याच्या अभिनयाचं जगाला कौतुक होतं. गाडी वेगानं निघाली होती, आणि नियतीनं चेन खेचली.

कॅन्सरशी झुंज देणाऱ्या इरफान खानचं वेदनादायी पत्र


सोनाली आणि इरफान दोन्ही गुणी कलाकार. फिटनेस आणि लाईफस्टाईलबद्दल दोघेही सजग. तरी कॅन्सरनं त्यांना कसं गाठलं? याचं उत्तर मिळणं अशक्य आहे. आयुष्यात आपण खूप प्लॅनिंग करतो. आडाखे बांधतो. भान विसरुन काम करतो. बऱ्याचदा छोट्यामोठ्या इच्छा-आकांक्षांचा बळीही देतो. कधी आपण दुखावले जातो, कधी लोकांना दुखावतो. अनिश्चित आयुष्याला हवा तसा आकार देण्यासाठी किती ती धडपड. त्यामुळे तुम्हाला आवडतं ते आणि आवडतं तसं काम करा. आनंदी राहा.

संबंधित बातम्या   

कर्करोगाशी झुंज दिलेले 11 सेलिब्रेटी


अभिनेत्री सोनाली बेंद्रेला कॅन्सर, न्यूयॉर्कमध्ये उपचार 

दुर्धर आजाराने इरफान खानला ग्रासलं, सोशल मीडियावर पोस्ट