मुंबई : पश्चिम बंगालमधील मौलवीच्या धमकीला प्रसिद्ध गायक सोनू निगम यांनी गांधीगिरी करत सडेतोड उत्तर दिले. सोनू निगमची टक्कल करुन त्याला फिरवण्याची धमकी मौलवीने दिली होती. त्याला उत्तर देण्यासाठी सोनूने स्वत:च टक्कल केली. आता सोनू निगमची टक्कल केल्याने आपल्याला 10 लाख रुपये देणार का, असा सवाल हेअरस्टायलिस्टला केला आहे.
मौलवीची धमकी काय?
अजानबाबत वक्तव्य केल्याने पश्चिम बंगालमधील सौय्यद शाह आतिफ अली अल कादरी या मौलवीने सोनू निगमविरोधात घोषणा केली होती की, सोनूची टक्कल करणाऱ्याला 10 लाखांचं बक्षीस दिले जाईल.
सोनूची गांधीगिरी
सोनू निगमने हेअर स्टायलिस्ट अलीमला भर पत्रकार परिषदेत बोलावून घेतलं आणि केस कापून टक्कल केलं. आलिम हा सेलिब्रिटी हेअरस्टायलिस्ट म्हणून प्रसिद्ध आहे.
सोनूच्या वक्तव्याबद्दल हेअरस्टायलिस्ट आलिम काय म्हणतो?
“सोनू निगमने कोणत्याही विशिष्ट धर्माबत विधान केले नाही. त्याने लाऊडस्पिकरचा मुद्दा उठवला होता.”, असे म्हणत हेअर स्टायलिस्ट आलिमने सोनू निगमच्या विधानांचं समर्थन केले आहे.
आता मौलवी 10 लाख रुपये आलिमला देणार?
सोनू निगमचं टक्कल केल्यास 10 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर करणाऱ्या मौलवीला उद्देशून आलमिने म्हटलं, मी सोनू निगमचं टक्कल केले आहे. त्यामुळे मला 10 लाखांचं बक्षीस मिळायला हवं.
https://twitter.com/ANI_news/status/854641272795123714
आता हेअर स्टायलिस्ट आलिमला मौलवी 10 लाखांचं बक्षीस देणार की अशाप्रकारचं बक्षीस जाहीर करणं केवळ प्रसिद्धीसाठी होतं, असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे.
नेमकं प्रकरण काय?
‘मी मुस्लीम नाही आणि तरीही मला अजानच्या आवाजामुळे झोपेतून उठावं लागतं. भारतातील जबरदस्तीची ही धर्मिकता कधी संपेल?’, असा सवाल सोनू निगमनं केला होता. शिवाय, ‘मोहम्मद यांनी ज्यावेळी इस्लामची सुरुवात केली, त्या काळात वीज नव्हती. मग एडिसननंतर हा कर्कश आवाज का?’, असंही सोनू निगमनं ट्वीटमधून विचारलं.
“जे लोक धर्माचे अनुयायी नाहीत, त्यांना भोंगे लावून उठवणाऱ्या कोणत्याही मंदिर किंवा गुरुद्वारावर माझा अजिबात विश्वास नाही.”, असंही ट्वीट सोनू निगमनं केलं होतं.
अजान म्हणजे काय?
नमाज अदा करण्याआधी मस्जिदमध्ये लोकांना बोलवण्यासाठी अजान दिली जाते. अजानचा अर्थ बोलावणं किंवा घोषणा करणं असा होतो. नमाजच्या आधी दिवसातून पाच वेळा अजान दिली जाते.