नवी दिल्ली: बॉलिवूड कलाकारांची दुर्धर आजारांची मालिका वाढत आहे. अभिनेता इरफान खाननंतर आता सोनाली बेंद्रेचं नाव या यादीत आलं आहे.  सोनाली बेंद्रेला हाय ग्रेड कॅन्सर  झाला आहे. स्वत: सोनाली बेंद्रेने त्याबाबतची माहिती ट्विटरवर दिली आहे. सध्या ती अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये उपचार घेत आहे.


हायग्रेड कॅन्सरचा साधा अर्थ म्हणजे वेगानं पसरणारा कॅन्सर. सोनालीनं स्वत: भावनिक पत्र लिहून ही धक्कादायक माहिती दिली आहे. मी आशादायी असून कॅन्सरच्या प्रत्येक स्टेजला सामोरं जाऊन लढण्यास तयार असल्याचं सोनालीनं तिच्या पत्रात म्हटलं आहे.

सोनाली बेंद्रेने ट्विटरवर पत्रक प्रसिद्ध करत, कॅन्सरचं निदान झाल्याचं म्हटलं आहे.

“कधी कधी तुम्हाला काही गोष्टींची कुणकुण लागते. आयुष्यात अचानक बदल होतो. नुकतंच मला हाय ग्रेड कर्करोग असल्याचं निदान झालं आहे. दुखण्यांमुळे काही चाचण्या केल्यानंतर, कॅन्सरचं निदान झालं”, असं सोनालीने म्हटलं आहे.

माझे मित्र आणि कुटुंबीय माझ्या अवतीभवती आहेत. ते शक्य ती सर्वोतोपरी मदत करत आहेत. त्या सर्वांचे मी खूप आभारी आहे, असं सोनालीने नमूद केलं आहे.

तातडीने उपचार घेऊन, तात्काळ इलाजाशिवाय आता पर्याय नाही. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी न्यूयॉर्कमध्ये उपचार घेत आहे. आपण नेहमीच सकारात्मक विचार करतो. त्यामुळे कॅन्सरशी लढण्याचा मी निश्चय केला आहे. गेल्या काही वर्षात मला प्रेम आणि पाठिंबा मिळाला, त्याबद्दल मी सर्वांची आभारी आहे. मी ही लढाई सुरुच ठेवणार, असंही सोनालीने म्हटलं आहे.


'इंडियाज बेस्ट ड्रामेबाज' शो सोडला

दरम्यान, झी टीव्हीवरील प्रसिद्ध रिअॅलिटी शो 'इंडियाज बेस्ट ड्रामेबाज'ध्ये मोठा बदल पाहायला मिळाला. पहिला एपिसोड टेलिकास्ट झाल्यानंतर शोची जज सोनालीने वैयक्तिक कारणांमुळे अचानक हा शो सोडण्याचा निर्णय घेतला होता. हे वैयक्तिक कारण म्हणजे कॅन्सरवरील उपचार असल्याचं आता स्पष्ट झालं आहे.

तिच्याजागी बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशी दिसणार आहे. विवेक ओबेराय आणि उमंग कुमार हे देखील या शोचे जज आहेत.