Sonalee Kulkarni : मराठी मनोरंजनसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये सोनाली कुलकर्णीचा (Sonalee Kulkarni) समावेश होतो. अभिनेत्रीने आपल्या अभिनयासह नृत्याने सर्वांना वेड लावलं आहे. मराठी मनोरंजनसृष्टी गाजवल्यानंतर आता साऊथमध्ये धुमाकूळ घालायला सोनाली सज्ज आहे. 'मलाइकोट्टाई वालिबान' (Malaikottai Vaaliban) मधील अभिनेत्रीचा लूक आता समोर आला आहे.


मराठी चित्रपटसृष्टीतील अप्सरा म्हणजेच आपल्या सर्वांची लाडकी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी. मराठी, बॉलिवूडमध्ये आपले अभिनयकौशल्य दाखवल्यानंतर आता सोनाली दाक्षिणात्य चित्रपटातून आपली अदाकारी दाखवण्यासाठी सज्ज झाली आहे.


सोनाली कुलकर्णी झळकणार मल्याळम चित्रपटात (Sonalee KulkarniMalayalam movie)


राष्ट्रीय पुरस्कार विजेते लिजो जोस पल्लीसरी दिग्दर्शित 'मलाइकोट्टाई वालिबान' या चित्रपटातून सोनाली मल्याळम चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. यात सोनाली सुपरस्टार मोहनलाल यांच्यासोबत स्क्रीन शेअर करणार आहे. 






'मलाइकोट्टाई वालिबान' मधील लूक आला समोर (Malaikottai Vaaliban Sonalee Kulkarni Look Out)


'मलाइकोट्टाई वालिबान' या चित्रपटातील एका गाण्याच्या माध्यमातून सोनालीचा फर्स्ट लूक प्रेक्षकांसमोर आला असून या फ्युजन लावणीत सोनालीची बहारदार अदा पाहायला मिळत आहे. आपल्या मनमोहक नृत्यदाकारीने सोनाली दक्षिणेतील प्रेक्षकांनाही घायाळ करणार असून महाराष्ट्राची ओळख असलेले लावणी नृत्य आता सोनाली दक्षिणात्य चित्रपटात गाजवणार आहे.


सोनालीचा पहिला भव्य प्रादेशिक चित्रपट 


'मलाइकोट्टाई वालिबान' या सिनेमाबद्दल बोलताना सोनाली कुलकर्णी म्हणाली,"हा माझा पहिलाच मल्याळम चित्रपट आहे. पहिल्याच चित्रपटात अशा दिग्गजांसोबत काम करण्याची संधी मला मिळाली, खूप आनंदाची गोष्ट आहे. आज या गाण्याच्या माध्यमातून माझ्या लूकवरील पडदा अखेर उठला आहे. जगभरात प्रदर्शित होणारा हा चित्रपट तामिळ, तेलुगू, कन्नड मध्ये 25 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे तर त्याच्या पुढील आठवड्यात हिंदी भाषेत प्रदर्शित होणार आहे".


सोनाली पुढे म्हणाली,'मलाइकोट्टाई वालिबान' हा चित्रपट युके, युएस, कॅनडासह अनेक देशांमध्ये प्रदर्शित होणार असून कॅनडामध्ये प्रदर्शित होणारा हा पहिला भव्य प्रादेशिक चित्रपट आहे. माझ्यासाठी हा एक खास अनुभव आहे. प्रेक्षक मला या नवीन व्यक्तिरेखेत स्वीकारतील, याची खात्री आहे".


संबंधित बातम्या


Mogal Mardini Chatrapati Tararani : नजरेत अंगार अन् हातात तलवार, "मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी"चं पोस्टर आऊट; चित्रपट 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला