सोनाने तीन ट्वीट्समधून कैलाश खेर यांनी केलेल्या गैरवर्तनाची हकिगत सांगितली आहे. 'मुंबईत एका कॅफेमध्ये कॉन्सर्टविषयी बोलण्यासाठी आम्ही भेटलो. त्यावेळी कैलाश यांनी माझ्या मांडीवर हात ठेवला. बरं झालं, एखाद्या अभिनेत्याऐवजी तू संगीतकाराला (राम संपत) जोडीदार म्हणून लाभलीस, असं कैलाश खेर म्हणताच मी तात्काळ निघून गेले. पण त्यांना फरक पडला नाही' असा दावा सोनाने केला आहे.
ढाका विमानतळावर उतरल्यावर मी त्यांचा फोन घेतल नव्हते. तेव्हा आयोजकांना फोन करुन त्यांनी माझ्याशी संपर्क साधला. साऊंड चेक रद्द करुन त्याऐवजी माझ्यासोबत वेळ घालवण्याचा प्रस्तावही त्यांनी ठेवला, असं सोनाने लिहिलं आहे. 'किती महिलांची माफी मागाल? आता सुरुवात केली, तर आयुष्य कमी पडेल' असा खोचक टोलाही तिने लगावला.
सोनाव्यतिरिक्त आणखी काही महिलांनीही कैलाश खेर यांच्यावर गैरवर्तनाचे आरोप केले आहेत. खेर यांच्या घरी मुलाखतीसाठी गेलेलं असताना त्यांनी असभ्य वर्तन केल्याचा दावा एका पत्रकार महिलेने केला होता. तर कैलाश खेर यांनी कोलकात्यातील आपल्या हॉस्टेल रुममध्ये येण्यासाठी वारंवार आग्रह केल्याचा दावाही एका तरुणीने केला आहे.
#MeToo या चळवळीअंतर्गत देशभरातील विविध क्षेत्रातल्या महिलांनी आपल्यावर झालेले लैंगिक अत्याचार, गैरवर्तन यांच्याविषयी आवाज उठवायला सुरुवात केली आहे. लेखिका विनिता नंदा यांनी फेसबुक पोस्ट लिहून आरोप केले आहेत. तर अभिनेत्री तनुश्री दत्ता, पूजा भट्ट, कंगना रनौत, विनिता नंदा यांनीही आपली आपबिती मीडियासमोर सांगितली होती. दिग्गज अभिनेते नाना पाटेकर, संस्कारी बाबूजी अलोकनाथ यांच्यापासून दिग्दर्शक विकास बहल, लेखक चेतन भगत, अभिनेता रजत कपूर, गायक कैलाश खेर अशा अनेक जणांवर आरोप झाले आहेत.
#MeToo चं वादळ त्यानंतर नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळातही दाखल झालं. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राज्यमंत्री एम जे अकबर यांच्यावर पत्रकार प्रिया रमानी यांनी लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत.