Sinhasan : 'सिंहासन' (Sinhasan) या गाजलेल्या मराठी सिनेमाला 44 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने मुंबईत या सिनेमाच्या विशेष स्क्रीनिंगचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान या सिनेमाचे दिग्दर्शक जब्बार पटेल यांनी (Jabbar Patel) 'सिंहासन'च्या आठवणींना उजाळा देत या सिनेमाच्या निर्मितीचे अनेक किस्से शेअर केले. जब्बार पटेल म्हणाले,"सिंहासन'च्या प्रिमिअरला शरद पवार (Sharad Pawar) आले होते. त्यानंतर तब्बल 44 आठवडे हा सिनेमा सिनेमागृहात चालला". 


'सिंहासन' हा सिनेमा प्रदर्शित झाला तेव्हा शरद पवार (Sharad Pawar) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यांच्याबद्दलचा एक किस्सा शेअर करत जब्बार पटेल म्हणाले,"सिंहासन'च्या रिलीजच्या पहिल्या दिवशी मी सिनेमागृहात गेलो होतो. तेव्हा या सिनेमाचं आठवडाभरासाठीचं अॅडव्हान्स बुकिंग झाल्याचं मला थिएटर मालकाने सांगितलं. दरम्यान प्रिमिअरला कोण येणार असल्याचं मी विचारलं असता त्याने मला मुख्यमंत्री येणार असल्याचं सांगितलं. 'सिंहासन'च्या प्रिमिअरला शरद पवार आले होते. त्यानंतर तब्बल 44 आठवडे हा सिनेमा सिनेमागृहात चालला".


'सिंहासन'ला सेन्सॉरशिप कशी मिळाली?


'सिंहासन'बद्दल बोलताना जब्बार पटेल म्हणाले,"सिंहासन' या सिनेमाला एक वेगळाच राजकीय रंग आहे. त्यामुळे निवडणुका जाहीर होण्याआधी या सिनेमाला सेन्सॉर मिळावी असा सल्ला त्यावेळी मला अनेकांनी दिला. त्यानंतर माझ्या एका मित्राने मला 10 एडिटिंग रुम दिल्या आणि एका दिवसात सिनेमाच्या एडिटिंगचं काम पूर्ण करुन मी सेन्सॉरशिप मिळवली. त्यानंतर निवडणुकांआधी हा सिनेमा प्रदर्शित व्हायहा हवा असा सल्ला माझ्या एका वकील मित्राने दिला. पण सिनेमाला सेन्सॉरशिप मिळाली असली तरी सिनेमा पूर्ण रेकॉर्ड झालेला नव्हता. त्यामुळे हिंदमाता सिनेमागृहाचे मालक मित्र असल्यामुळे त्यांना एक शो लावण्यासाठी मी आग्रह केला". 


जब्बार पटेल पुढे म्हणाले,"सिंहासन' या सिनेमाला राजकीय टच असल्यामुळे हा सिनेमा किती कमाई करेल याची चिंता सतावत होती. पण त्यावेळी व्ही शांताराम यांनी मला बोलावलं आणि सिनेमा चांगला झाल्याबद्दल कौतुक केलं. तसेच आता हा सिनेमा प्रदर्शित व्हायला हवा, असंही ते म्हणाले. शरद पवार मुख्यमंत्री असूनही, त्यांनी सिनेमाच्या निर्मितीत अजिबात हस्तक्षेप केला नाही". 


'सिंहासन'चं विशेष स्क्रीनिंग


'सिंहासन' या गाजलेल्या मराठी सिनेमाला 44 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीनं या सिनेमाच्या विशेष स्क्रीनिंगचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यानिमित्तानं एबीपी माझाचे मुख्य संपादक राजीव खांडेकर आणि ज्येषठ पत्रकार अंबरिश मिश्र यांनी 'सिंहासन' सिनेमाचे दिग्दर्शक जब्बार पटेल, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह मोहन आगाशे आणि नाना पाटेकर या अभिनेत्यांनाही बोलतं केलं. दिग्दर्शक जब्बार पटेल यांनी 'सिंहासन'च्या निर्मितीचे किस्से सांगितले.


संबंधित बातम्या


'सिंहासन' - त्रिकालाबाधित राजकारणाचा मानबिंदू...