Singer KK Funeral: प्रसिद्ध बॉलीवूड गायक कृष्णकुमार कुन्नाथ, अर्थात केके (KK) यांचे वयाच्या 53व्या वर्षी कोलकाता येथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. कोलकाता येथील नजरुल मंच येथे एका मैफिलीत सादरीकरण करत असताना त्यांची तब्येत बिघडली होती. यानंतर ते हॉटेलमध्ये परतले आणि खाली कोसळले. रात्री 10.30च्या सुमारास त्यांना कोलकाता मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये नेण्यात आले होते, तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. केके यांच्या निधनामुळे संपूर्ण इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे. त्यांचे पार्थिव आज (2 जून) मुंबईत आणण्यात आले होते.
कोलकाता येथे शवविच्छेदन केल्यानंतर बुधवारी संध्याकाळी केके यांचा मृतदेह एअर इंडियाच्या विमानाने मुंबईत आणण्यात आला. केके यांच्या पार्थिवावर आज (2 जून) मुंबईत अंत्यसंस्कार होणार आहेत. गायक केके यांचे पार्थिव मुंबईतील पार्क प्लाझा वर्सोवा येथील संकुलाच्या सभागृहात अंत्यसंस्कारासाठी ठेवण्यात येणार आहे. येथे चाहते आणि कलाकार त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करू शकतात. त्यानंतर वर्सोवा येथील हिंदू स्मशानभूमीत केके यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. केके यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे. वयाच्या अवघ्या 53व्या वर्षी त्यांच्या निधनाने मनोरंजन विश्वाला खूप मोठा धक्का बसला आहे. केके यांचे पार्थिव आज सकाळी 10.30 ते 12.30 वाजेपर्यंत त्यांच्या घरी अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.
दुसरीत असताना गायलं पहिलं गाणं
केके यांचा जन्म दिल्लीमध्ये जन्म 23 ऑगस्ट 1968 रोजी झाला होता. दिल्लीतील माउंट मेरी स्कूलमध्ये केके यांनी शिक्षण घेतलं. इयत्ता दुसरीत असताना त्यांनी आपले पहिले गाणं गायले. तसेच केके यांनी किरोडी मल कॉलेजमधून पदवीचे शिक्षण पूर्ण केले. ग्रॅज्युएशननंतर केके यांनी मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह म्हणून नोकरीही केली आणि या दरम्यान त्यांनी 35 हजारांहून अधिक जिंगल्स गाण्यांचा रेकॉर्ड केला. 1999 मध्ये त्यांचा पल नावाचा त्यांचा पहिला अल्बम रिलीज केला.
प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांनी केके यांना बॉलिवूडमध्ये गाण्याची पहिली संधी दिली. 'माचीस' चित्रपटातील गाण्यांमधून गायक केके यांना विशेष लोकप्रियता मिळाली. माचीस चित्रपटामधील छोड आये हम... या चित्रपटातील गाण्यांना खूप प्रसिद्धी मिळाली. 1999 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'हम दिल चुके सनम' या चित्रपटामधील तड़प तड़प के... या केके यांच्या गाण्याला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.
नऊ भाषांमध्ये केली गाणी रेकॉर्ड
केके यांनी हिंदीसोबतच नऊ भाषांमधील गाणी रेकॉर्ड केली आहेत. हिंदी चित्रपटांमध्ये केकेनं 200 पेक्षा जास्त गाणी गायली आहेत. फिल्मफेयर अवार्ड देऊन देखील केके यांनी गौरवण्यात आलं आहे.
इतर संबंधित बातम्या
- Krishnakumar Kunnath Died : गायक केके यांच्या निधनाने संगीत विश्वावर शोककळा, पंतप्रधान मोदींसह मान्यवरांकडून श्रद्धांजली
- Krishnakumar Kunnath Died: केकेने गायलेली 'ही' गाणी कधीच विसरता येणार नाही
- Krishnakumar Kunnath Died : गायक केके यांचे निधन, कोलकाता येथील लाईव्ह कॉन्सर्ट दरम्यान हृदयविकाराचा झटका