तिरुअनंतपुरम : तामिळ सिनेसृष्टीतील गायक, संगीतकार आणि व्हायोलिनवादक बालाभास्कर यांच्या कुटुंबाला केरळमध्ये भीषण कार अपघात झाला. यामध्ये बालाभास्कर आणि त्यांची पत्नी लक्ष्मी गंभीर जखमी झाले आहेत. तर दुर्दैवाने त्यांच्या दोन वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू झाला.

केरळमधील तिरुअनंतपुरममध्ये बालाभास्कर यांची गाडी झाडावर आदळली. मंगळवारी सकाळी थिसुरहून देवदर्शनानंतर परतताना त्यांना अपघात झाला. चालकाला डुलकी लागल्यामुळे अपघात झाल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

अपघातात बालाभास्कर आणि त्यांची पत्नी लक्ष्मी गंभीर जखमी झाले आहेत. तर त्यांची दोन वर्षांची मुलगी तेजस्विनीला प्राण गमवावे लागले. त्यांचा ड्रायव्हर अर्जुनही अपघातात जखमी आहे.

बालाभास्कर यांनी वयाच्या बाराव्या वर्षी स्टेज शो करायला सुरुवात केली होती. दक्षिण भारताला फ्यूजन संगीताची ओळख करुन देण्यात त्यांचा मोठा वाटा मानला जातो. 17 व्या वर्षी त्यांनी मल्ल्याळम चित्रपटांना संगीत द्यायला सुरुवात केली.

बालाभास्कर आणि लक्ष्मी यांचा विवाह 2000 साली झाला होता. लग्नाच्या 16 वर्षांनी तेजस्विनीचा जन्म झाला, मात्र दुर्दैवाने ती अल्पायुषी ठरली.