Shivpratap Garudzep : विजयादशमीच्या मुहूर्तावर 5 ऑक्टोबरला ‘शिवप्रताप-गरुडझेप’ (Shivpratap Garudzep) हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला असून या सिनेमाने चांगलाच धुमाकूळ घातला. हा सिनेमा आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांना आता घरबसल्या 'शिवप्रताप गरुडझेप'चा थरार अनुभवायला मिळणार आहे.
'शिवप्रताप गरुडझेप' या सिनेमात डॉ. अमोल कोल्हे त्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत आहेत. तर या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा कार्तिक केंढे यांनी सांभाळली आहे. 'जगदंब क्रिएशन'च्या बॅनरखाली अमोल कोल्हेंनी या सिनेमाची निर्मिती केली आहे.
'शिवप्रताप गरुडझेप' सिनेमाचं कथानक काय आहे?
रक्ताचा एकही थेंब न सांडता आपल्या बुद्धिचातुर्याच्या बळावर औरंगजेबाच्या बलाढ्य मुघल सत्तेचा पोलादी पहारा भेदून केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्र्याहून सुटकेचा प्रसंग जिवंत करणारा डॉ. अमोल कोल्हेंचा 'शिवप्रताप गरुडझेप' हा सिनेमा आहे.
आग्रा येथील अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून युक्ती, साहस व दूरदृष्टी यांच्या जोरावर महाराजांनी मिठाईच्या पेटार्यातून बसून स्वतःची व राजपुत्र संभाजीची नजरकैदेतून सुटका करून घेतली. आग्रा येथून यशस्वीपणे निसटून दख्खनमध्ये रायगड येथे येण्यात महाराजांनी यश मिळविले. शिवचरित्रातील ही तेजस्वी यशोगाथा शिवप्रताप गरुड़झेप या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर पहायला मिळणार आहे.
आग्रा भेटीचा थरार आता ओटीटीवर!
'शिवप्रताप गरुडझेप' हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार असल्याचे डॉ. अमोल कोल्हेंनी एक खास पोस्ट शेअर करत सांगितले आहे. 'टीएफएस प्ले' या ओटीटी प्लॅटफॉर्मवर 'शिवप्रताप गरुडझेप' या सिनेमाचा वाईड ओटीटी प्रिमियर होणार आहे.
'शिवप्रताप गरुडझेप' या सिनेमात डॉ. अमोल कोल्हेंसह यतीन कार्येकर, प्रतीक्षा लोणकर, हरक अमोल भारतीया, शैलेश दातार, हरीश दुधाडे, मनवा नाईक आणि पल्लवी वैद्य महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.
संबंधित बातम्या