Shiv Thakare : 'बिग बॉस' (Bigg Boss) फेम शिव ठाकरे (Shiv Thakare) सध्या चर्चेत आहे. नुकतीच एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत 'आपला माणूस' शिव ठाकरेने अमरावती ते 'बिग बॉस' या प्रवासाबद्दल भाष्य केलं आहे. शिव म्हणाला, "माझा प्रवास अमरावतीपासून सुरु झाला तो अजूनही संपलेला नाही. मला वाटतं आता कुठे सुरुवात झाली आहे. 'आपला माणूस' या नावाने मला फक्त महाराष्ट्रात ओळख होती. पण संपूर्ण भारतात या नावाने मला ओळखावं, अशी माझी इच्छा होती."
आपल्या प्रवासाबद्दल बोलताना शिव पुढे म्हणाला, "रोडीज' या कार्यक्रमात मराठी माणूस म्हणून माझी ओळख होती. मराठी बिग बॉसमुळे मला महाराष्ट्रातील मंडळी ओळखायला लागली. पण प्रत्येकाने मला ओळखावं असं माझं स्वप्न होतं आणि ती ओळख मला हिंदी बिग बॉसने (Bigg Boss 16) दिली. हिंदी बिग बॉसमुळे फक्त भारतातीलच नाही तर जगभरातील लोक मला ओळखू लागले. मराठी मनोरंजनसृष्टी माझ्या पाठिशी खंबीरपणे उभी राहिली".
शिव ठाकरेला 'बिग बॉस 16'मध्ये कोणत्या गोष्टीचा त्रास झाला का?
'बिग बॉस 16'बद्दल बोलताना शिव ठाकरे म्हणाला, "बिग बॉस 16'मध्ये मला कधीच कोणत्या गोष्टीचा त्रास झाला नाही. मी बिग बॉस मराठीमधून आलोय त्यामुळे मी कुठेतरी कमी पडेन असं इतर स्पर्धकांना वाटलं होतं. पण मी त्या सगळ्यांना पुरुन उरलोय. मी वाघ आहे असं माझ्याविरोधात असणारे स्पर्धक म्हणत होते. त्यांना माझं एकच म्हणणं होतं, तुम्ही हलक्यात घेऊ नका."
शिव ठाकरे 'आपला माणूस' कसा?
शिव ठाकरे हे नाव आता घराघरांत लोकप्रिय आहे. 'रोडीज', 'बिग बॉस मराठी' आणि हिंदी बिग बॉस असे एकापेक्षा एक रिअॅलिटी शो शिव ठाकरेने केले आहेत. मग तरी तो 'आपला माणूस' कसा असा प्रश्न अनेकांना पडतो. यावर भाष्य करताना शिव ठाकरे म्हणाला, "मी लोकांना जोडणारा माणूस आहे. माझं स्वप्न मोठ्या पडद्यावर दिसण्याचं आहे. अजूनही सेलिब्रिटीवाला टॅग आलाय, असं मला वाटत नाही. माझ्या मागे मीडिया आणि चाहत्यांची होणारी धावपळ हाच माझ्या स्वप्नांचा प्रवास आहे. मेहनत घेत पुढे आलो आहे आणि आजही घेत आहे. त्यामुळे आजही मी 'आपला माणूस' आहे.
मराठी बिग बॉसनंतर शिव ठाकरे रुपेरी पडद्यावर दिसेल, अशी चाहत्यांची इच्छा होती. पण शिव ठाकरेचा एकही मराठी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला नाही. याबद्दल बोलताना शिव म्हणाला, "मराठी सिनेमांसाठी मला विचारणा झाली. पण काही कारणाने त्या सिनेमासाठी माझी निवड झाली नाही. पण मी खचणाऱ्यातला नाही. कदाचित माझी अजून वेळ आलेली नाही सगळा नशिबाचा खेळ आहे. पण लवकरच मी प्रेक्षकांना रुपेरी पडद्यावर दिसेल".
संबंधित बातम्या