रमेश सोलंकी यांच्या तक्रारीनंतर नेटफ्लिक्सविरोधात शिवसनेने तक्रार केली असल्याच्या बातम्या पसरु लागल्या. त्यानंतर शिवसेनेने त्यांच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलद्वारे जाहीर केले की, शिवसेना पक्षाच्या वतीने नेटफ्लिक्सविरोधात तक्रार नोंदवल्याबद्दलची बातमी खोटी आहे. सर्व प्रसारमाध्यमांना विनंती आहे की जनतेची दिशाभूल करणार्या चुकीच्या बातम्या छापण्यापूर्वी आमच्या अधिकृत पदाधिकाऱ्यांकडून याची पुष्टी करावी.
नुकतीच प्रदर्शित झालेली सेक्रेड गेम्स (Sacred Games)(दुसरे पर्व), लैला (Leila) आणि राधिका आपटेच्या घुल (Ghoul) या वेब सीरिजविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे स्टॅण्ड अप कॉमेडियन हसन मिव्हाज यांनी त्यांच्या शोमध्ये देशाविरोधी कृत्य केल्याचाही आरोप रमेश यांनी केला आहे. नेटफ्लिक्स इंडियावरील प्रत्येक मालिकेचा जागतिक स्तरावर भारताची बदनामी करण्याचा उद्देश असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
हिंदूंच्या भावना दुखावल्याबद्दल नेटफ्लिक्सविरोधात योग्य ती कारवाई करण्यात यावी, असे आवाहन सोलंकी यांनी केले आहे. या तक्रारीची एक प्रत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई पोलीस आयुक्तांनाही पाठवल्याचे सोलंकी यांनी सांगितले.
दरम्यान, आमचे चित्रण संपूर्णपणे काल्पनिक आहे आणि आम्ही कुणाच्याही भावना दुखावल्या नसल्याचे 'लिला' या वेब सीरिजचे लेखक पॅट्रिक ग्रॅहम यांनी स्पष्ट केलं.
काही दिवसांपूर्वी रेड लेबल चहाच्या जाहिरातमध्ये हिंदूंचा अपमान झाल्याचा दावा करत अनेकांनी रेड लेबलचा निषेध केला होता. नेटीझन्सनी #BoycottRedLabel या हॅशटॅगद्वारे विरोध करण्यात आला.