शिल्पा शेट्टी-राज कुंद्रा विभक्त होण्याच्या मार्गावर?
एबीपी माझा वेब टीम | 03 Jun 2016 10:29 AM (IST)
मुंबई : बॉलिवूडमध्ये सध्या अनेक ब्रेक अप आणि घटस्फोटांच्या बातम्या येत आहेत. त्यातच बॉलिवूडची ब्यूटी शिल्पा शेट्टी आणि पती राज कुंद्राही विभक्त होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. शिल्पा शेट्टी आणि राज यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून बिनसल्याचं बोललं जात आहे. लवकरच दोघं घटस्फोट घेणार असल्याचं वृत्त आहे. शिल्पा-राज हे बॉलिवूडमधल्या परफेक्ट कपल मानलं जातं. त्यामुळे दोघं विभक्त होण्यामागे नेमकं काय कारण आहे, याविषयी आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. राज कुंद्राने मात्र या चर्चा उडवून लावल्या आहेत. शिल्पाने राज तिला वेळ देत नसल्याची गोड तक्रार तिच्या मैत्रिणीकडे केली होती. मात्र ही तक्रार चुकीच्या पद्धतीने बाहेर पसरली, असं राज म्हणतो. 'मी 20-20 तास ऑफिसमध्ये काम करायचो. मला अक्षरशः श्वास घ्यायला आणि झोपायलाही वेळ नसायचा. मी फक्त फ्रेश व्हायला घरी जायचो.' असं स्पष्टीकरण राजने दिलं आहे. 8 जून रोजी शिल्पाच्या बर्थडे साठी आपण सरप्राईझ प्लान केल्याचंही राजने सांगितलं. काही वर्षांच्या प्रेमप्रकरणानंतर शिल्पा आणि राज 2009 मध्ये विवाहबंधनात अडकले. नुकताच त्यांनी मुलगा विआनचा वाढदिवस साजरा केला.